घराच्या बांधकामावर पाणी मारताना बसला विजेचा धक्का, युवकाचा जागीच मृत्यू; सांगलीतील जतमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 15:54 IST2023-01-20T14:41:59+5:302023-01-20T15:54:06+5:30
महाविद्यालयाला सुटी असल्याने घरी आला असता घडली ही दुर्दैवी घटना

घराच्या बांधकामावर पाणी मारताना बसला विजेचा धक्का, युवकाचा जागीच मृत्यू; सांगलीतील जतमधील घटना
विठ्ठल ऐनापुरे
जत : घराच्या बांधकामावर मोटरच्या साह्याने पाणी मारत असताना विजेचा धक्का बसून सतरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. संतोष आबासाहेब माने (रा. मानेवस्ती, जत) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.
शहरापासून चार कि.मी. अंतरावर जत - सांगोला रोडलगत माने वस्ती आहे. याठिकाणी माने कुटुंबीय राहते. संतोष घराच्या बांधकामावर मोटरच्या साह्याने पाणी मारत असताना पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा धक्का बसला. वडील व शेजाऱ्यांनी त्याला तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. डॉक्टरांनी घटनेची माहिती जत पोलिस स्टेशनला कळवली. त्यानंतर पोलिस पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मृत संतोष हा कवठेमहांकाळ शहरातील आय. टी. आय. कॉलेजमध्ये पहिल्या वर्षामध्ये शिकत होता. सुटीचे दरम्यान तो घरी आला होता. दरम्यान, ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या पश्चात आई -वडील व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेची जत पोलीस स्टेशन येथे नोंद झाली आहे.