Sangli: मिरजेत हुल्लडबाजी करणाऱ्या दीडशे जणांवर गुन्हे; १३ जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:45 IST2025-10-09T19:44:23+5:302025-10-09T19:45:04+5:30
विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची मिरजेस भेट

Sangli: मिरजेत हुल्लडबाजी करणाऱ्या दीडशे जणांवर गुन्हे; १३ जण ताब्यात
मिरज : धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री मिरजेत संतप्त जमावाने दगडफेक केली. या घटनेत पोलिसांनी हुल्लडबाजी व दगडफेक करणाऱ्या सुमारे दीडशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी मिरजेस भेट दिली. सुधीर हिरेमठ यांनी शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. हा प्रकार घडला त्या शास्त्री चौकात त्यांनी पाहणी केली. पोलीस आणि शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले.
मिरज येथील नदीवेस परिसरातील कोळी गल्लीत दोन तरुणांत झालेल्या वादातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाल्याने दुसऱ्या गटाने संबंधित तरुणास मारहाण केली. त्यानंतर संतप्त जमाव शहर पोलिस ठाण्यात जमा झाला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध, तर जमावबंदी आदेशाचा भंग व दगडफेक केल्याबद्दल दुसऱ्या गटातील दीडशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी ३५ जणांची ओळख पटली असून १३ जणांना ताब्यात घेतले आहे.
संवेदनशील भागांत पोलिस बंदोबस्त
बुधवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती. पोलिस अधीक्षक संदीप घुगे व वरिष्ठ अधिकारी दिवसभर मिरजेत ठाण मांडून होते., कोल्हापूर विभागाचे प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी मिरजेस भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. शहरातील संवेदनशील भागांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक मिरजेत तळ ठोकून
पोलिस अधीक्षक संदीप घुगे बुधवारी मिरजेत तळ ठोकून होते. शहरात प्रमुख मार्गावर संचालनात ते सहभागी होते. त्यांनी मिरजेत दगडफेक झाली नाही, कोणीही पोस्टर फाडले नाही, जमावाचा धक्का लागुन पोस्टर फाटल्याचे. सांगितले.दगडफेक झाली असेल तर संबंधितावर कारवाई होईल. दगडफेकीबाबत कोणाची तक्रार असेल तर त्यांनी तक्रार द्यावी, असे आवाहन अधीक्षक घुगे यांनी केले