Sangli Municipal Election 2026: तिकीट नाही मिळाले, निष्ठेचे मुखवटे गळाले; पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:15 IST2026-01-01T17:08:41+5:302026-01-01T17:15:11+5:30
पक्षासोबतच राहीन अशी ग्वाही दिली, तिकीट न मिळताच बंडखोरी केली

Sangli Municipal Election 2026: तिकीट नाही मिळाले, निष्ठेचे मुखवटे गळाले; पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान
शीतल पाटील
सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतीदरम्यान अनेक इच्छुक उमेदवारांनी “तिकीट मिळाले नाही तरी मी पक्षासोबतच राहीन” अशी ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तिकीट न मिळताच या आश्वासनाची हवा निघाल्याचे चित्र समोर आले आहे. यात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये झाली आहे. मुलाखतीत पक्षनिष्ठेची शपथ घेणाऱ्यांपैकीच अनेकांनी आता थेट उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. काहींनी अपक्ष म्हणून तर काहींनी थेट विरोधी पक्षांत प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून अनेक इच्छुकांनी महापालिकेची तयारी सुरू केली होती. प्रभागात संपर्क वाढविला होता. विविध मंडळे, बचत गट, महिला मंडळासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम घेत नगरसेवक पदासाठी मोर्चेबांधणी केली होती. त्यात पक्षाच्या नेत्यांशीही सलगी ठेवत पदोपदी निष्ठा दाखवून दिली होती. काही इच्छुक सोशल मीडियावर सातत्याने “मी पक्षाशी एकनिष्ठ आहे”, “पक्षासाठी आयुष्य वाहीन” असे पोस्ट शेअर करत होते. मात्र, तिकीट न मिळताच तेच चेहरे दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर झळकत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वाचा : सांगलीत बंडखोरांच्या मनधरणीने नववर्ष सुरु, भाजपमध्ये सर्वाधिक बंड
भाजपची अधिकृत उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच पक्षांतराचे वारे वाहू लागले होते. तरीही पक्षाकडे ५७० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. या मुलाखतीवेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंगे यांनी इच्छुकांना उमेदवारी मिळाली अथवा न मिळाली तर काय करणार? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यास पक्षासोबतच राहणार असल्याचे वचन दिले होते. पण त्यातील अनेक इच्छुकांनी पक्षनिष्ठा पायदळी तुडवत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला तर काहींनी शिंदेसेना, महाआघाडी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पर्याय निवडत रिंगणात उडी घेतली आहे.
वाचा : जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी २२४ उमेदवारांचे अर्ज
राजकीय पक्षांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करणारे हे इच्छुक उमेदवार प्रत्यक्षात मात्र निष्ठेपेक्षा तिकीट महत्त्वाचे मानत असल्याचा आरोप आता खुलेआम होत आहे. यामुळे पक्षसंघटनात्मक शिस्त, निष्ठा आणि विश्वासार्हता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बंडखोरीमुळे पक्षांच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवरही टीका होत असून, पक्षासाठी काम करणारे खरे कार्यकर्ते बाजूला पडत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर उघड झालेल्या या निष्ठाभंगामुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
भाजपकडून दहाहून अधिक माजी नगरसेवकांना नकार
भाजपने यंदा १० हून अधिक माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. त्यातील भाजपचे विलास सर्जे, अनारकली कुरणे, शुभांगी देवमाने, गायत्री कल्लोळी, अर्पणा कदम, आशा शिंदे यांना महाआघाडीने उमेदवारी दिली. तर भाजपचे माजी उपमहापौर युवराज बावडेकर, शीतल सदलगे, शुभम बनसोडे, सुजित काटे, प्रा. रविंद्र ढगे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. विनायक सिंहासने, दीपक माने, दरिबा बंडगर, माया लेंगरे, अमोल गवळी यांच्यासह अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.