Sangli- अर्भक चोरी प्रकरण: अज्ञाताने दिलेली माहिती कामी आली, अन् संशयित महिला सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:31 IST2025-05-06T14:30:51+5:302025-05-06T14:31:12+5:30
पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास

Sangli- अर्भक चोरी प्रकरण: अज्ञाताने दिलेली माहिती कामी आली, अन् संशयित महिला सापडली
मिरज : मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून अर्भक पळवून नेणारी महिला सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली होती. त्या आधारे आणखी काही फूटेज तपासल्यानंतर संशयित महिला तासगाव-मिरज बसमधून शासकीय रुग्णालयाच्या आवारात उतरल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी तासगाव तालुक्यात तपास केला. याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने सावळजमध्ये नवजात बालक आणलेल्या महिलेची माहिती दिली अन् प्रकरणाचा उलगडा झाला.
संशयित सारा साठे हिने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मिरजेतून अंकली फाटा गाठले. तेथून ती सावळजला गावी गेली. साराचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी ती रुग्णालयात कोठून आली, याचा शोध सुरू केला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता तासगाव ते मिरज बसमधून सिव्हिलच्या प्रवेशद्वारात उतरल्याचे सीसीटीव्हीत दिसले. तासगाव बस स्थानकातून मिरजेच्या बसमध्ये ती चढल्याचीही खात्री झाली. तासगावपर्यंत तिचा माग काढल्यानंतर पोलिसांना अज्ञाताने सावळजमध्ये सारा साठे ही महिला एक नवजात बाळ घेऊन आल्याची माहिती दिली. यामुळे पोलिस सारापर्यंत पोहोचले.
प्रसूती विभागाची परिपूर्ण माहिती
सारा व तिचा पती साहेबा हे इचलकरंजी येथील असून, दोघे जण प्रेमविवाह करून सावळज गावात येऊन राहिले आहेत. साहेबा हा पेंटिंगचा व्यवसाय करतो. काही महिन्यांपूर्वी सारा हिचा गर्भपात झाल्याने तिला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे तिला तेथील प्रसूती विभागाची पूर्ण माहिती होती. त्यातून तिने जन्मलेले बाळ चोरण्याचे धाडस केले.
पतीची कसून चौकशी
साहेबा साठे याच्या घरी पोलिस गेल्यानंतर त्याने नवजात अर्भक हे आमचेच असल्याचा दावा केला. साहेबा याचीही पत्नीच्या कृत्यास मूकसंमती असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.
पोलिस पथकाचे अभिनंदन
अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीतू खोकर, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी अर्भकास शोधून काढणाऱ्या साहाय्यक निरीक्षक सुनील गिड्डे व पोलिस पथकाचे अभिनंदन केले. पोलिसांनी अर्भक शोधण्यासाठी केलेला कौशल्यपूर्ण तपास कौतुकाचा विषय ठरला आहे. या कामगिरीबद्दल शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार केला.
बाळाची होणार डीएनए तपासणी
पोलिसांनी शोधून काढलेल्या नवजात अर्भकाची आता डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. बाळ त्याच मातेचे आहे, याची खातरजमा करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मातेच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा
अतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन बाळाला मातेकडे सोपविल्यानंतर कविता यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाळ कुशीत आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनीही कविता यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे बातचीत करून त्यांना धीर दिला.