Sangli: इस्लामपुरात भाजप अन् पोलिसांत धूसफूस, अवैध धंदे वाढले कसे ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:53 IST2025-03-26T18:53:32+5:302025-03-26T18:53:54+5:30
अशोक पाटील इस्लामपूर : शहरातील गुन्हेगारी, खासगी सावकारी, गुटखा, अमली पदार्थांविरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांनी इस्लामपूर पोलिस ...

Sangli: इस्लामपुरात भाजप अन् पोलिसांत धूसफूस, अवैध धंदे वाढले कसे ?
अशोक पाटील
इस्लामपूर : शहरातील गुन्हेगारी, खासगी सावकारी, गुटखा, अमली पदार्थांविरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांनी इस्लामपूरपोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय हारूगडे यांच्या बदलीसाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. आंदोलन चिघळण्याने पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांत झटापट झाली. त्यामुळे भाजप आणि पोलिस यांच्यात धूसफूस सुरू आहे.
शहर आणि परिसरात बेकायदेशीर धंद्यांना ऊत आला आहे. यावर पोलिस कारवाई करत नाहीत. याउलट तडजोडीच जास्त होतात. याविरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांनी पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांच्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बदलीसाठी तक्रार केली आहे. याउलट शहर आणि परिसरातील नेत्यांनी संजय हारूगडे यांची पाठिंबा दर्शविला. त्यांच्यामुळेच शहरातील बेकायदेशीर धंद्यांना आळा बसला आहे. अशा प्रकारचे निवेदनही स्थानिक नेत्यांनी शासनाला दिले आहे. त्यामुळे विक्रम पाटील आणि संजय हारूगडे यांच्यातील संघर्ष टोकास गेला आहे.
शहरातील अवैद्य धंद्यांना राजकीय वरदहस्त आहे. त्यातच इस्लामपूर पोलिस ठाणे कडक कारवाई करत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी, चोरी, खासगी सावकारी, खुलेआम गुटखा विक्री, अंमली पान विक्रीचा व्यवसाय सुसाट चालला आहे. पोलिस जुजबी कारवाई करण्याचे नाटक करतात. त्यामुळे अशा धंद्यांना ऊत आला आहे. यावर विक्रम पाटील यांनी निवेदन देऊन संजय हारूगडे यांची बदली करण्याची मागणी केली होती. परंतु, यश न आल्याने तहसीलदार कार्यालयावरील महिलांच्या मोर्चात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न होत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करीत हाणून पाडला. यातूनच आता भाजप आणि पोलिसात संघर्ष चांगलाच पेटला आहे.
अवैध धंदे वाढले कसे ?
पोलिस उपनिरीक्षक संजय हारूगडे आपण त्या रस्त्याला नाही, असे सांगतात. परंतु, पोलिस ठाण्यातील कर्मचारी मात्र बिंधास्तपणे घडलेल्या गुन्हेगारीवर तडजोडी करून पांघरूण घालतात. त्यामुळेच शहरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
विक्रम पाटील आपला टीआरपी वाढवण्यासाठी आंदोलन करीत आहेत. मला सर्वसामान्य भेटू शकतात. इस्लामपूर पोलिस ठाण्याचे कामकाज जलद आहे. - संजय हारूगडे, पोलिस निरीक्षक इस्लामपूर
संजय हारूगडे शहरातील अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत आहेत. पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून इस्लामपुरात काम करण्यास हारूगडे अपयशी ठरले आहेत. - विक्रम पाटील, ज्येष्ठ नेते, भाजप इस्लामपूर