Sangli Municipal Election Voting 2026: सांगली महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान; ईव्हीएममध्ये बिघाड, बोगस मतदानाच्या तक्रारी, दिवसभरात कुठं काय झालं..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 20:49 IST2026-01-15T20:45:06+5:302026-01-15T20:49:35+5:30
किरकोळ वादावादीचे प्रकार : उद्या मतमोजणी

Sangli Municipal Election Voting 2026: सांगली महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान; ईव्हीएममध्ये बिघाड, बोगस मतदानाच्या तक्रारी, दिवसभरात कुठं काय झालं..वाचा
सांगली : राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सरासरी ६० टक्के मतदान झाले. २० प्रभागातील ७८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ३८१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. सांगलीत चार तर मिरजेत दोन केंद्रावर ईव्हीएमध्ये बिघाड झाला. दोन मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकारही उघडकीस आला. अनेक प्रभागात दिग्गज उमेदवार रिंगणात असल्याने तणावाचे वातावरण होते. शुक्रवारी मिरजेतील शासकीय गोदामात सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली. साडेनऊ वाजेपर्यंत ६.४५ टक्केच मतदान झाले. यात १७ हजार ८६५ पुरुष मतदार व ११४३९ महिला मतदारांनी हक्क बजाविला होता. पहिल्या दोन तासात संथगतीने मतदान सुरू होते. अनेक केंद्रावर तुरळक गर्दी होती. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत मतदानात सरासरी दहा टक्क्यांनी वाढ होऊन १७.२० टक्के मतदान झाले. दुपारी बारानंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
प्रतिष्ठेच्या प्रभाग ९, १०, ११, १२ व १३ मध्ये लांबच लांब रांगा होत्या. दुपारी दीड वाजेपर्यंत २९. २३ टक्के मतदान झाले. तर दुपारी साडेतीन वाजपर्यंत मतदानाची टक्केवारी ४१.७९ पर्यंत पोहोचली होती. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान केंद्रावर गर्दी होती. मतदानाची वेळ संपल्यानंतर नवीन वसाहत, सर्वोदय हायस्कूल, ल. पा. पाटील विद्यालय, सह्याद्रीनगर शाळा यासह बहुतांश केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या.
ईव्हीएममध्ये बिघाडामुळे तणाव
सकाळीच काही प्रभागात ईव्हीएममध्ये बिघाड झाला. प्रभाग दहामधील सर्वोदय हायस्कूल, सह्याद्रीनगरमधील शाळा नंबर २३, सिटी हायस्कूलसह विविध केंद्रावरील ईव्हीएम बंद पडले होते. प्रभाग १० मध्ये ईव्हीएम उलटसुलट ठेवल्याने उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतला.
सांगलीत दोन ठिकाणी बोगस मतदानाच्या तक्रारी
सांगलीतील प्रभाग ९ मधील लाड शाळा येथील मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला. याच प्रभागातील सुपर इंग्लिश स्कूलच्या केंद्रावरही एक बोगस मतदानांचा प्रकार घडला.
मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. एकाचवेळी सहा प्रभागाची १४ टेबलावर मतमोजणी होणार असून अकरा वाजेपर्यंत पहिला निकाल अपेक्षित आहे. दुपारी अडीत ते तीन वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.