नंदीवाले समाजातील अमोल गोंडे बनला पोलिस उपनिरीक्षक, इस्लामपूरच्या माळावरील झोपडीतून गिरवले शिक्षणाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 17:04 IST2024-12-28T17:03:24+5:302024-12-28T17:04:36+5:30
मूळच्या मेडद-बारामतीच्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी

नंदीवाले समाजातील अमोल गोंडे बनला पोलिस उपनिरीक्षक, इस्लामपूरच्या माळावरील झोपडीतून गिरवले शिक्षणाचे धडे
इस्लामपूर : बारामतीच्या मेदड गावातून नंदीबैल घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी गावागावांतून गोंडे कुटुंब भटकंती करते. याच कुटुंबातील अमोल मालन चिमाजी गोंडे या युवकाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. पोटाची आणि जगण्याची भ्रांत असलेल्या परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले यश अनेकांना प्रेरणादायी आहे.
इस्लामपुरातील ख्रिश्चन बंगल्याच्या मैदानावर वर्ष १९९९ मध्ये नंदीबैलासोबत भटकंती करत गोंडे कुटुंबातील पालं आली होती. दरम्यान, येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका शकुंतला पाटील यांनी शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षण केले. त्यातून अमोल हा शिक्षणाच्या प्रवाहात आला होता. जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक दोन या शिवनगर भाग शाळेत तो शिकू लागला. चौथीच्या शिष्यवृत्तीमध्ये अमोल व त्याचा चुलतभाऊ दिवाणजी या दोघांचा पाटील बाई यांनी स्वतःच्या घरी सांभाळ केला. त्यावेळी शिक्षिका सरोजिनी मोहिते यांचेही सहकार्य मिळाले.
पालं उठल्यावर सगळी कुटुंब साताऱ्याला गेली. त्यानंतर सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मेदडसह अनेक गावांत भटकंती करत अमोलने पूर्ण केले. बारामती येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २०१५ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाची पूर्व व मुख्य परीक्षा झाला; पण अंतिम यादीत नाव आले नाही. त्यानंतर २०१७ ते २०१९ दरम्यान तीन वेळा मुख्य परीक्षेत यश मिळवले; पण मुलाखतीसाठी निवड झाली नाही. जुलै २०२३ च्या अंतिम यादीत त्याची निवड झाली.
आज बाई हव्या होत्या..!
मला शाळेचे दार उघडून देणाऱ्या माझ्या शिक्षिका शकुंतला पाटील आज हयात नाहीत. त्यांची आज आठवण होत आहे. त्यांच्याकडून मिळालेले बाळकडू मला प्रेरणा देणारे ठरले. माझे यश पाहण्यासाठी माझ्या बाई हव्या होत्या, अशी भावना अमोल गोंडे यांनी व्यक्त केली.
आमचा पोरगा साहेब झालाय यावर विश्वास बसत नाही. आम्ही दारोदारी जाऊन लोकांना राम राम घालतो, नमस्कार करतो. आता माझ्या मुलाला लोक सलाम करतील याचा अभिमान वाटतो. - मालन व चिमाजी गोंडे, आई-वडील