Sangli: शिराळ्यात पारंपरिक नागपंचमीस परवानगी द्या; सत्यजीत देशमुख यांची अमित शाह यांच्याकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:17 IST2025-06-21T14:15:52+5:302025-06-21T14:17:08+5:30
सकारात्मक निर्णय घेऊ

संग्रहित छाया
शिराळा : शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी शिराळावासीयांची लोकभावना आहे. तिचा आदर करीत केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यामध्ये खास बाब म्हणून सुधारणा करून पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे आमदार सत्यजित देशमुख यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री शाह यांना शिराळा विधानसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन दिले.
आमदार देशमुख म्हणाले की, जगप्रसिद्ध शिराळा नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी खासदार धैर्यशील माने, विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह याबाबत पाठपुरावा सुरू आहे. नागपंचमी ही हिंदू धर्म, रूढी, परंपरा, आचरणाप्रमाणे साजरी करून मूलभूत अधिकार जपावेत, अशी विनंती केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी विनंती केली.
सकारात्मक निर्णय घेऊ
शिराळा येथील एम.आय.डी.सी.मध्ये उद्योग व्यवसाय उभारणीसाठी सहकार्य करावे. जेणेकरून येथील तरुणांना शाश्वत रोजगार उपलब्ध होईल. शिराळा मतदारसंघातून जाणारा पेठ- कोकरूड- मलकापूर- अनुस्कुरा घाट जोडणाऱ्या या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा. या मार्गांवरून प्रवासी, पर्यटकांना गोवा, मुंबईकडे जाणे सोयीचे होईल, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे शाह यांच्याकडे केल्या. यावेळी अमित शाह यांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.