Sangli Municipal Election 2026: भाजपमध्ये फडकले बंडाचे वारे, भाजपचे १० माजी नगरसेवक महाआघाडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:10 IST2025-12-31T19:09:55+5:302025-12-31T19:10:33+5:30
नेत्यांची डोकेदुखी वाढली, माजी नगरसेवकही मैदानात

Sangli Municipal Election 2026: भाजपमध्ये फडकले बंडाचे वारे, भाजपचे १० माजी नगरसेवक महाआघाडीत
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट कटताच बंडखोर मैदानात उतरले आहेत. मंगळवारी अंतिम दिवशी भाजपच्या माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले. काही नाराजांनी शिंदेसेना, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजपला धक्का दिला. आता बंडखोर व अपक्ष उमेदवारांची मनधरणी करण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच निवडणूक कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गर्दी होती. सोमवारी रात्री भाजपकडून अधिकृत उमेदवारांना एबी फाॅर्म देण्यात आले. काहींना मंगळवारी सकाळी फाॅर्म दिले. यंदा भाजपकडे ५२९ जणांनी उमेदवारी मागितली होती. पण अनेकांच्या पदरी निराशा आली. त्यात माजी नगरसेवकांचाही पत्ता कट झाला होता. उमेदवारी न मिळाल्याने काहींनी अपक्ष म्हणून तर काहींनी अन्य पक्षांतून उमेदवारी मिळवली आहे.
प्रभाग १४ गावभाग परिसरातून माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांचे तिकीट कापण्यात आले. त्यांनी शिंदेसेनेतून अर्ज दाखल केला. बावडेकर यांनी भाजपविरोधात पॅनल उभे केले आहे. या पॅनलमध्ये भाजपचेच शीतल सदलगे, वैशाली विकास बनसोडे, सुकन्या खाडिलकर यांचा समावेश आहे. प्रभाग आठमधून माजी नगरसेविका कल्पना कोळेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तर माजी नगरसेविका सोनाली सागरे यांचे बंधू महेश सागरे शिवसेनेतून मैदानात उतरले आहेत.
प्रभाग ९ मधून भाजपच्या इच्छुक प्रियांका बंडगर यांनी अपक्ष, तर रवींद्र ढगे यांनी शिवसेनेतून अर्ज दाखल केला. प्रभाग १० मधील रौनक शहा यांनीही अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका अनारकली कुरणे व जयश्री पाटील समर्थक राजेंद्र मुळीक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग ११ मधून भाजपचे प्रतिभा दीपक माने यांनी अर्ज दाखल केला, तर सुजित काटे, माया लेंगरे व सुप्रिया साळुंखे यांनीही शिवसेनेतून तर प्रभाग १२ मधील इच्छुक आशा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रभाग १४ मध्ये नाराज केदार खाडिलकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. याशिवाय भाजपचे अविनाश मोहिते, शेखर कोरे, अभय खाडिलकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केले. प्रभाग १६ मधून अमो गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपवर नाराजी दर्शवली. प्रभाग १९ मधून भाजपचे माजी नगरसेवक विनायक सिंहासने व अप्सरा वायदंडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजपचे १० माजी नगरसेवक महाआघाडीत
भाजपने तिकीट नाकारलेल्या दहा माजी नगरसेवकांना काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर एका नगरसेवकासह माजी नगरसेविकांच्या नातेवाइकांनी शिंदेसेना, ठाकरेसेनेकडून अर्ज दाखल केले. चार ते पाच माजी नगरसेवक अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत.
भाजपचे उमेदवार असे
प्रभाग १ :- रवींद्र सदामते, माया गडदे, पद्मश्री प्रशांत पाटील, चेतन सूर्यवंशी
प्रभाग २ : प्राजक्ता धोतरे, प्रकाश ढंग, मालुश्री खोत, प्रकाश पाटील
प्रभाग ३ : सुनीता व्हनमाने, शशिकला दोरकर, छाया जाधव, संदीप आवटी
प्रभाग ४ : अपर्णा शेटे, विद्या नलावडे, मोहन वाटवे, निरंजन आवटी
प्रभाग ५ : बिस्मिला शेख, मीनाक्षी चौगुले, राकेश शिंदे, राजकुमार कबाडे
प्रभाग ६ : मुनेरा शरीकमसलत, अनिता कोरे, अल्लाबक्ष काझी, अल्लाबक्ष गाडेकरी
प्रभाग ७ : उज्ज्वला कांबळे, दयानंद खोत, बानू जमादार, गणेश माळी
प्रभाग ८ : दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, संजय पाटील
प्रभाग ९ : संतोष पाटील, वर्षा सरगर, रोहिणी पाटील, अतुल माने
प्रभाग १० : गीता पवार, प्रकाश मुळके, रिद्धी म्हामुलकर, जगन्नाथ ठोकळे
प्रभाग ११ : संजय कांबळे, सविता रुपनर, शुभांगी साळुंखे, मनोज सरगर
प्रभाग १२ : लक्ष्मी सरगर, रईसा शिकलगार, संजय यमगर, धीरज सूर्यवंशी
प्रभाग १३ : महाबळेश्वर चौगुले, अनुराधा मोहिते, मीनल पाटील
प्रभाग १४ : मनीषा कुकडे, उदय बेलवलकर, अनिता पवार, विजय साळुंखे
प्रभाग १५ : महमंदबशीर बागवान, श्वेता लोखंडे, विद्या नलवडे, हणमंत पवार
प्रभाग १६ : प्रदीप बन्ने, विद्या दानोळे, स्वाती शिंदे, उत्तम साखळकर
प्रभाग १७ : लक्ष्मण नवलाई, मालन गडदे, गीतांजली ढोपे, प्रशांत पाटील
प्रभाग १८ : गाथा काळे, बिस्मिल्ला शेख, वैशाली गवळी, शैलेश पवार
प्रभाग १९: अलका ऐवळे, सविता मदने, कीर्ती देशमुख, संजय कुलकर्णी
प्रभाग २० : तृप्ती कांबळे, सुनील गवळी, योगेंद्र थोरात