मिरजेतील 'त्या' वादग्रस्त जागेत पडळकर यांच्या मालकीचा फलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 18:35 IST2023-02-02T18:35:11+5:302023-02-02T18:35:58+5:30
फलक लावताना येथील कब्जेधारकांच्या विरोधामुळं तणाव निर्माण

मिरजेतील 'त्या' वादग्रस्त जागेत पडळकर यांच्या मालकीचा फलक
मिरज : मिरजेतील बसस्थानकाजवळ वादग्रस्त जागेत ब्रह्मानंद पडळकर यांनी मालकी असल्याचा फलक बुधवारी पडळकर समर्थकांनी लावला. येथील कब्जेधारकांनी फलक लावण्यास विरोध केल्याने पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला होता.
मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी जागा विकत घेतली आहे. या जागेचा कब्जा घेण्यासाठी गेल्या महिन्यात मध्यरात्री सात ते आठ दुकानगाळे पाडण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. याबाबत तहसीलदारांनी सुनावणी घेऊन दुकानदारांना पुन्हा कब्जा दिला. कब्जासाठी पडळकर यांना न्यायालयात जाण्याचा आदेश दिल्याने गाळेधारकांना दिलासा मिळाला.
मात्र, बुधवारी पुन्हा पडळकर यांच्या काही समर्थकांनी या जागेची मालकी असल्याचा फलक वादग्रस्त जागेवर लावला. फलक लावताना येथील कब्जेधारकांच्या विरोधामुळं तणाव निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला. पडळकर समर्थकांनी मालकीचा फलक लावला आहे.