Sangli: तुम्ही कोण लागून गेलात, पालकमंत्री संतापले; मिरजेत महायुतीच्या बैठकीत रंगले मानापमान नाट्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:59 IST2025-09-27T17:59:27+5:302025-09-27T17:59:50+5:30
सुरेश आवटी यांना बोलावले नसल्याने पालकमंत्र्यांना विचारला जाब, संदीप आवटींचा पक्षत्यागाचा इशारा

Sangli: तुम्ही कोण लागून गेलात, पालकमंत्री संतापले; मिरजेत महायुतीच्या बैठकीत रंगले मानापमान नाट्य
मिरज : महायुतीच्यामिरजेत झालेल्या बैठकीस ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांना निमंत्रण न मिळाल्याने मानापमानाचे नाट्य रंगले. यावरून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माजी नगरसेवक संदीप आवटी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी आवटी यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिल्याने वातावरण तापले.
दि. १ ऑक्टोबर रोजी सांगलीत होणाऱ्या रावणदहन कार्यक्रम व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ सभेच्या तयारीसाठी गुरुवारी रात्री मिरज विश्रामगृहात बैठक झाली. बैठकीस आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. सदाभाऊ खोत, जनसुराज्यचे समित कदम, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान संदीप आवटी यांनी, माझे वडील ज्येष्ठ नेते असूनसुद्धा त्यांना बैठकीस बोलावले नाही, असा विषय उपस्थित केला. यावर पालकमंत्र्यांनी बैठकीनंतर चर्चा करू असे सांगितले. मात्र आवटी यांनी उत्तर आताच द्या, असा आग्रह धरला.
बैठक संपल्यानंतर बंद खोलीत पालकमंत्र्यांनी संदीप आवटींना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी, निवडणुकांत तुमची पक्षविरोधी भूमिका होती. लोकसभा-सांगली विधानसभा निवडणुकीत तुम्ही अपक्षाचा प्रचार केला. तुम्हाला बोलवायला कोण लागून गेला, माझ्या जिल्हाध्यक्षाचा अपमान सहन करणार नाही, असे सुनावले.
यावर संदीप आवटी यांनी आम्ही मिरजेत पक्षाचा प्रचार केला. मात्र सांगलीत पक्षाच्या मंडळींनी वहिनींचा छुपा प्रचार केला. अपमान सहन करून आम्ही पक्षाचे काम करणार नाही. आत्ता राजीनामा देतो,” असे ठणकावले. त्यामुळे वाद अधिकच वाढला. संदीप आवटी व निरंजन आवटी बैठक न संपवता, न जेवता तेथून निघून गेले.
दादांना कोणीतरी भडकावले
ज्येष्ठ नेते सुरेश आवटी म्हणाले की, दादांना कोणीतरी भडकावले आहे. आम्हाला पक्षाच्या बैठकीचे निरोप मिळत नाहीत. निवडणुकीत आम्ही लपूनछपून काही केले नाही. उलट लपूनछपून करणारे दादांच्या जवळ आहेत. आम्ही मिरजेत पक्षाचा प्रचार केला याची नोंद घ्यायला हवी.