Sangli: मिरजेत अंगावर भिंत कोसळून बांधकाम कामगाराचा मृत्यू, दोघे जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 13:18 IST2024-02-17T13:18:23+5:302024-02-17T13:18:47+5:30
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी

Sangli: मिरजेत अंगावर भिंत कोसळून बांधकाम कामगाराचा मृत्यू, दोघे जण गंभीर जखमी
मिरज : शहरातील लोणी बाजारात इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक भिंत कोसळून तम्मान्ना कांबळे (वय ५०, रा. ऐनापूर, ता. अथणी) या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. तर विटा व मातीखाली गाडले गेल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले.
लोणीबाजारात मिरज हिंदमाता चौकात सकाळी ११ वाजता ही घटना घडली. जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तम्मान्ना कांबळे याच्यासह तिघे कामगार विटाच्या भिंतीचे बांधकाम करीत असताना अचानक भिंत पडून विटा, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तम्मान्ना कांबळे याच्यासह सिद्धप्पा पुजारी (वय ३५, रा. खाजा बस्ती, मिरज) व धोंडीराम लांडगे (४६, रा. राजीव गांधी नगर, मिरज) या तिघांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तम्मान्ना कांबळे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अन्य दोघे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
हिंदमाता चौकात चार मजली नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम ठेकेदाराने रोजंदारीवर कामास आणलेले आठ मजूर सेंट्रिंग व बांधकाम करीत होते. यावेळी नवीन बांधलेली १५ फूट उंच भिंत अचानक कोसळल्याने तिघे जण त्याखाली गाडले गेले. मृत तम्मान्ना कांबळे याची परिस्थिती हलाखीची असून, तो दररोज सकाळी कामाच्या शोधात कर्नाटकातून मिरजेत येत होता. सिद्धप्पा पुजारी व धोंडीराम लांडगे हे दोघे जखमी कामगारही रोजंदारीवर मिळेल ते काम करीत होते. बांधकाम ठेकेदाराने नवीन भिंत बांधताना आवश्यक काळजी घेतली नसल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा होती. याबाबत शहर पोलिसात नोंद असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी
बांधकाम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्याने अर्धवट बांधकाम कोसळून तम्मान्ना कांबळे या कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले. या मिळकतीचा मालक व ठेकेदार घटनेला जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची व मृत कामगाराच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी मिरज सुधार समितीने पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.