Sangli: मिरजेत जमावबंदी आदेशाचा भंगप्रकरणी २३ जणांना अटक, शहरात मोठा पोलिस बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 18:44 IST2025-10-10T18:44:08+5:302025-10-10T18:44:30+5:30
तरुणातील भांडणाचे पर्यावंसन दोन गटात तणावात झाले

Sangli: मिरजेत जमावबंदी आदेशाचा भंगप्रकरणी २३ जणांना अटक, शहरात मोठा पोलिस बंदोबस्त
मिरज : मिरजेत दोन गटात तणावपूर्ण स्थिती निवळली आहे, मात्र उद्या शुक्रवारी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी बैठक घेत शहरातील मशिदींच्या विश्वस्तशी संवाद साधला. मिरजेत तिसऱ्या दिवशीही पोलिस बंदोबस्त कायम होता. जमावबंदी आदेशाचा भंग प्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आली. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या सातजणांना चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री मिरजेत दोन तरुणातील भांडणाचे पर्यावंसन दोन गटात तणावात झाले. यावेळी जमाव शहर पोलिस ठाण्यासमोर जमल्याने शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पिटाळले. गुरुवारी तिसऱ्या दिवशीही शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरु होते.मात्र उद्या शुक्रवारी शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस ठाण्यात मोहल्ला कमिटी बैठक झाली. शहरातील मशिदींचे इमाम, धर्मगुरू, विश्वस्त बैठकीत सहभागी होते.
नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहरात शांतता प्रस्थापित झाली. यापुढेही समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे. सोशल मीडियावर कोणीही वादग्रस्त पोस्ट करु नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणताही प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक घुगे यांनी केले. शुक्रवारी संपूर्ण शहरातील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून जमाव जमवून हुल्लडबाजी करणाऱ्या २३ जणांना अटक करण्यात आली. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या सातजणांना नोटिसा बजावण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी सांगितले.
वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या नऊ जणांवर कारवाई
सांगली : मिरजेतील दोन गटांतील वादाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टाग्रामवर दिशाभूल करणारा संदेश प्रसारित करून स्टेटस ठेवल्याबद्दल ९ तरुणांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. सायबर पोलिसांची समाजमाध्यमावर करडी नजर असून वादग्रस्त पोस्ट, स्टोरी, स्टेटस ठेवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.