Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 23:00 IST2025-07-28T22:58:14+5:302025-07-28T23:00:23+5:30
नागपंचमीनिमित्त सांगलीतील शिराळा येथील भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार आहे.

Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
नागपंचमीनिमित्तसांगलीतील शिराळा येथील भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार आहे. निसर्गचक्रातील नागांचे महत्त्व नागरिकांना करुन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभागाने ही परवानगी दिली. ग्रामस्थांना याबाबत शर्थी व अटीवर परवानगी दिली असल्याने नागपंचमीच्या मुहूर्तावर २१ नाग पहावयास मिळतील. मात्र, नागांच्या खेळावरील बंदी कायम ठेवली आहे.
शिराळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ पारधी यांनी सांगितले की, शिराळा वनक्षेत्रातील २१ ग्रामस्थांनी यासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांनी २१ अर्जदारांना नाग पकडण्यासाठी २७ ते ३१ जुलै या कालावधीत परवानगी दिली आहे. केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपारीक ज्ञान प्रसारण करण्यासाठी ही परवानगी दिली आहे. यामध्ये कोणतीही व्यावसायिक किंवा मनोरंजन, स्पर्धा, मिरवणूक, खेळ, याला अटकाव कायम आहे. यामध्ये नागांचा एकही मृत्यू होणार नाही व नाग सुरक्षितपणे मूळ अधिवासात सोडण्याची सूचना विभागाने केली आहे.
भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांनी पत्रकार सांगितले की, २१ जिवंत नागांची माहिती यावेळी भाविकांना दिली जाणार आहे. नागरिकांनी उत्सवात संयम बाळगावा. प्रशासनास सर्वांनी सहकार्य करावे. शिराळा हे जागतिक धार्मिक पर्यटनाचे स्थळ म्हणून नावारूपास येईल यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत. येथील नागरिकांचे नागाबाबत प्रेम, धार्मिक, रूढी ,परंपरा याची माहिती जागतिक स्तरावर पोहोचवू. लोकचळवळ पुनर्स्थापित करून ही नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी करावी, यासाठी न्यायालयीन लढ्यासाठी सर्व पुरावे न्यायालयात सादर केले जातील. यावेळी हणमंतराव पाटील, संपतराव देशमुख, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, पृथ्वीसिंह नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक आदी उपस्थित होते.
अमित शहा यांनी शब्द दिला होता
सत्यजित देशमुख म्हणाले, विधानसभा निवडणुकीत नागपंचमीचा प्रश्न ऐरणीवर होता. त्यावेळी गृहमंत्री शहा यांनी शिराळकरांना शब्द दिला होता. या परवानगीच्या माध्यमातून त्यांनी तो शब्द खरा केला आहे. येथील लोकांची नागदेवतेवर श्रद्धा आहे. त्यामुळे या श्रद्धेचा विजय या निर्णयातून झाला आहे. शासनाने दिलेल्या शर्थी, अटींचे तसेच सुचनांचे पालन करुन आम्ही यंदाची नागपंचमी साजरी करु.