लोकसभेसाठी दीड हजार उमेदवार सांगलीत अर्ज भरणार, मराठा स्वराज्य संघाची घोषणा

By संतोष भिसे | Published: March 10, 2024 05:34 PM2024-03-10T17:34:07+5:302024-03-10T17:35:06+5:30

मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली माहिती

1500 candidates for Lok Sabha will apply in Sangli, Maratha Swarajya Sangh announced | लोकसभेसाठी दीड हजार उमेदवार सांगलीत अर्ज भरणार, मराठा स्वराज्य संघाची घोषणा

लोकसभेसाठी दीड हजार उमेदवार सांगलीत अर्ज भरणार, मराठा स्वराज्य संघाची घोषणा

संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात अशी आमची मागणी आहे. पण हम करेसो कायदा या मानसिकतेत असणाऱ्या भाजप सरकारकडून आमची मागणी मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली.

लोकसभेसह विधानसभा व अन्य सर्व निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी मराठा स्वराज्य संघ पाठपुरावा करत आहे. सांगलीत पत्रकार बैठकीत साळुंखे म्हणाले, ईव्हीएममधून मतदान फिरवता येते हे सिद्ध झालेले नसले, तरी देशभरातून त्याला विरोध होत आहे. जपान, अमेरिका फ्रान्ससारख्या प्रगत देशांतही ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जातात. भारतात ईव्हीएमच्या माध्यमातूनच भाजपने आतापर्यंत दोनवेळा बहुमत मिळविले यात शंका नाही. ईव्हीएमविरोधात विविध न्यायालयांत याचिका दाखल झाल्या आहेत, पण त्यांचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर आम्हीच ईव्हीएमच्या बंदोबस्तासाठी पुढाकार घेतला आहे.
साळुंखे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील ७०० गावांतून प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक अर्ज भरणार आहेत. त्याशिवाय सांगली, मिरज शहरे व अन्य नगरपालिका क्षेत्रांतूनही मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज भरतील. जिल्हाभरातून सुमारे १५०० अर्ज भरले जाणार आहेत. ईव्हीएमची क्षमता ३८५ उमेदवारांची आहे. त्यामुळे निवडणूक बॅलेट पेपरवरच घेणे आयोगाला भाग पडेल. याकामी सकल मराठा क्रांती मोर्चासह समविचारी संघटनांचीही मदत घेणार आहोत.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रणधीर कदम, प्रवक्ते संतोष पाटील, डॉ. महेश भोसले, सतीश जाधव, अण्णा कुरळपकर, सुधीर चव्हाण,  सतीश पाटील, सुनील दळवी, सर्जेराव पाटील पंडित पाटील आदी उपस्थित होते. संघटनेच्या जत तालुकाध्यक्षपदी ॲड. सिद्धू अण्णाप्पा महाडिक यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली.

"फडणवीसांनी फसविले"

मराठा आरक्षण व कुणबी प्रमाणपत्रे याबाबतीत राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप साळुंखे यांनी केला. ते म्हणाले, यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच मेंदू आहे. त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण दूषित करण्याचे पाप केले आहे. सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाची अंलबजावणी केली नाही. राज्यातील सहा कोटी मराठा मतदारांनी येत्या निवडणुकांत त्यांना हिसका दाखवावा.

Web Title: 1500 candidates for Lok Sabha will apply in Sangli, Maratha Swarajya Sangh announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.