घरी असो किंवा ऑफीसमध्ये अगदी मित्रपरिवारातही आपल्याला अजिबात किंमत मिळत नाही किंवा आपलं मत कोणाला महत्त्वाचं वाटत नाही असं तुम्हाला वाटतं का? ही भावना फार वाईट आणि मनाला आतून चावणारी असते. असे झाले की आपला आत्मविश्वास डळमळतो. (Everyone underestimates you, your opinion doesn't matter? Do 5 things, people will respect you)आपल्या मताला किंमत दिली जात नाही, आपण काही बोललो तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा सतत तुलना केली जाते, तेव्हा मन दुखावतंच. अशा परिस्थितीत अनेक जण स्वतःवरच शंका घ्यायला लागतात. मात्र प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या वागण्यामुळे आपली किंमत कमी होत नाही, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं.
एखादी व्यक्ती आपल्याला कमी लेखत असेल तर सर्वात आधी स्वतःचा आत्मविश्वास ढासळू देऊ नका. अनेकदा समोरची व्यक्ती स्वतःला मोठं दाखवण्यासाठी दुसऱ्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे प्रत्येक टोमणा किंवा टीका मनावर घेण्याऐवजी शांतपणे परिस्थितीकडे पाहणं गरजेचं असतं. स्वतःच्या क्षमता, मेहनत आणि चांगल्या गोष्टींची आठवण ठेवली की मन अधिक मजबूत राहतं.
अशा वेळी लगेच रागाने प्रतिक्रिया देण्यापेक्षा संयमाने उत्तर देणं जास्त प्रभावी ठरतं. कोणी सतत तुमचं बोलणं तोडत असेल किंवा कमीपणा दाखवत असेल तर शांत पण ठाम आवाजात स्वतःचं मत मांडणं महत्त्वाचं आहे. आपण जेवढ्या रागाने व्यक्त होऊ तेवढीच परिस्थिती विरोधात जाते. त्यामुळे संयम महत्वाचा. अपमान सहन करा असे नाही मात्र आरडाओरडा करुन काही साध्य होणार नाही. कामाच्या ठिकाणी कमी लेखलं जात असेल तर आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. आपल्या कामाची गुणवत्ता, वेळेचं नियोजन आणि सातत्य या गोष्टी शेवटी स्वतःची ओळख निर्माण करतात. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागण्यापेक्षा शांतपणे प्रगती करत राहणं अधिक महत्त्वाचं असतं.
घरातही काही वेळा तुलना, टीका किंवा दुर्लक्ष यामुळे मन दुखावतं. अशावेळी भावना मनात साठवून ठेवण्यापेक्षा योग्य वेळी शांतपणे संवाद साधणं आवश्यक असतं. घरच्यांना तुम्हाला त्यांच्या वागण्याचा कसा त्रास होतो ते स्पष्टपण मात्र योग्य पद्धतीने सांगा. जेव्हा तुम्ही दुसर्यांच्या मताला जास्त महत्व देता तेव्हा तुमची किंमत आपोआप कमी व्हायला लागते. ठाम राहायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी आयुष्याचा भाग आहेत त्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ न देणं फार गरजेचं आहे.
