चहा हे पेय नसून अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी उठल्यापासून ते ऑफिसच्या ब्रेक्सपर्यंत, चहाशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. अनेकजण तर दिवसभरात ६ ते ७ वेळा चहा पितात. पण चहा प्यायल्यानंतर ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास आपल्याला जाणवतो. छातीत जळजळ होणे, आंबट पाणी येणे किंवा पोटात अस्वस्थ वाटणे अशा अनेक तक्रारींचा सामना आपल्याला करावा लागतो. (Natural ways to reduce pitta from tea) रिकाम्या पोटी चहा पिणाऱ्यांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. यामुळे आपल्याला इच्छा नसतानाही चहा पिणं बंद करावं लागतं. (Tea drinking habits to avoid acid reflux)
पण चहा सोडण्याऐवजी चहा पिण्याच्या सवयींमध्ये काही बदल केल्यास आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही. चहामध्ये असलेले कॅफिन आणि टॅनिन शरीरातील अॅसिडचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे आपल्याला जळजळ सुरु होते. चहा पिण्यापूर्वी काही उपाय केल्यास आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही. पाहूया नेमका कोणता उपाय आहे, ज्यामुळे चहा प्यायल्यानंतर पित्त थांबवता येईल. (Healthy way to make tea to avoid gas)
1. चहा पिण्यापूर्वी एक ग्लास कोमट किंवा साधे पाणी प्या. हा ॲसिडिटीवर मात करण्यासाठी सोपा उपाय आहे. जेव्हा आपण पाणी पितो, तेव्हा आपल्या पोटातील अॅसिड सौम्य होते. यामुळे चहा प्यायल्यानंतर पोटातील पीएच पातळी संतुलित राहते आणि ॲसिडिटी होत नाही.
2. सकाळी उठल्यानंतर बेड टी घेण्याची सवय पोटासाठी अत्यंत हानिकारक असते. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पोटातील आम्ल ज्यूसचे प्रमाण वाढवते. त्यासाठी चहा घेण्यापूर्वी नाश्ता करा. बिस्किट, टोस्ट किंवा दोन बदाम खाल्ल्यास चहाचा आपल्याला पोटावर परिणाम होत नाही.
3. अनेकांना खूप उकळलेला कडक चहा पिण्याची सवय असते. चहा जितका जास्त उकळला जातो, तितके त्यात टॅनिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे पित्त होते. तसेच चहामध्ये आले, गवती चहा किंवा वेलची घातल्यास पचन सुधारते आणि गॅसचा त्रास देखील कमी होतो.
4. चहामधील अति साखर देखील ॲसिडिटी वाढवण्यास मदत करते. शक्य असल्यास आपण साखरेऐवजी गुळाचा चहा प्यायला हवा किंवा साखरेचे प्रमाण कमी करा. गुळामुळे पचनशक्ती सुधारते.
5. अनेकांना जेवण झाल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. यामुळे अन्नातील पोषक घटक शोषले जात नाहीत आणि अपचनाचा त्रास होऊन पित्त वाढते. जेवण आणि चहा यामध्ये किमान १ तासांचे अंतर ठेवायला हवे.
6. दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा पिणे टाळा. जास्त प्रमाणात चहा प्यायाल्याने आपल्या झोपेवर परिणाम होतो. आम्लपित्तापासून आराम मिळवण्यासाठी बडीशेप खा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटातील जळजळ कमी होते. थंड दूध प्यायल्याने पोटाला आराम मिळतो आणि शरीरातील आम्लाचा प्रभाव कमी होतो. तसेच छोटासा गुळाचा तुकडा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारेल आणि पित्त होणार नाही.
