उन्हाळ्यात घसा कोरडा पडतो, अशावेळी आपल्याला सतत काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते. सहसा आपण यावेळी लिंबू सरबत किंवा कोकम सरबत पितोच पण जर त्याच कोकमला थोडा स्पाईसी आणि नवीन टच दिला तर त्याची चव दुप्पट होते. कोकम पिकांते किंवा कोकम मॉकटेल हे केवळ दिसायला आकर्षक नसते, तर ते पिणाऱ्याला झटपट ताजेतवाने (Refresh) करते. कोकममध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि ते पचनासाठीही उत्तम मानले जाते.
अनेकदा उन्हामुळे पित्ताचा त्रास किंवा अन्नावरचा वास उडतो, अशावेळी कोमकमधील आंबटपणा आणि त्यात घातलेले तिखट-मिठ जिभेची चव परत आणतात. हे ड्रिंक बनवायला अत्यंत सोपे आहे. हॉटेल किंवा कॅफेमध्ये मिळणारे महागडे मॉकटेल आपण घरच्या घरी अवघ्या १० मिनिटांत तयार करू शकतो. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी किंवा दुपारच्या कडक उन्हात स्वतःला थंडावा देण्यासाठी हे कूल-स्पाईसी कोकम मॉकटेल कसं बनवायचं.
साहित्य
कोकम ज्यूस किंवा सिरप - ३० मिली
मध - ३० मिली
लाल मिरची - बारीक तुकडे केलेली
लिंबाची पाने - ३
तुळशीची पाने - ३
कोथिंबीर - थोडीशी
लिंबाचा रस - अर्धा चमचा
सोडा
बर्फ - भरपूर
ग्लासच्या कडेला लावण्यासाठी- मीठ, पिठीसाखर आणि मिरची पावडरचे मिश्रण
कृती
1. सगळ्यात एका भांड्यात लिंबाची पाने, कोथिंबीर, लाल मिरचीचे बारीक तुकडे आणि तुळशीची पाने एकत्र करुन हलके क्रश करुन घ्या.
2. आता एका शेकरमध्ये लिंबाचा रस, मध, कोकम सिरप आणि बर्फ घालून सर्व साहित्य शेक करुन घ्या.
3. सर्व्हिंग ग्लासच्या कडांना लिंबू फिरवा. नंतर त्यावर मीठ, साखर आणि मिरचीच्या मिश्रणात बुडवून घ्या. ग्लासमध्ये बर्फाचे घाला. आता त्यात कोकमचे तयार मिश्रण गाळणीने गाळून ग्लासात ओता. त्यात वरुन सोडा ओता. मिरची आणि कोथिंबीर लावून सजवून थंडगार सर्व्ह करा.
