Ratnagiri: ब्रेक निकामी झाला, टेम्पो थेट गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू
By अरुण आडिवरेकर | Updated: September 29, 2023 17:00 IST2023-09-29T16:59:29+5:302023-09-29T17:00:34+5:30
पाच जण जखमी

Ratnagiri: ब्रेक निकामी झाला, टेम्पो थेट गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू
गुहागर : ब्रेक निकामी झालेला टेम्पो गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत घुसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाचेरी आगर भुवडवाडी (ता. गुहागर) येथे गुरूवारी (दि.२८) सायंकाळी घडली. गाडी चालक दीपक लक्ष्मण भुवड (५०) आणि काेमल नारायण भुवड (१७) असे दाेघांची नावे असून, पाच जण जखमी झाले आहेत.
पाचेरी आगर भुवडवाडी येथील गणपती विसर्जनासाठी गुरुवारी सायंकाळी ब्राह्मणवाडी फाटा येथील पुढील पाण्याच्या भागात नेले जातात. हे अंतर भुवडवाडीपासून अर्धा किलोमीटर असून, तीव्र उताराचे आहे. या उतारातून मिरवणूक जात असताना मिरवणुकीमधील २०७ जीप गाडीचे ब्रेक निकामी झाले आणि गाडी विसर्जनातील ग्रामस्थ व महिलांच्या अंगावर गेली. कोणाला काही समजण्याच्या आतच गाडीचे मालक चालक दीपक लक्ष्मण भुवड यांच्यासह कोमल नारायण भुवड यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात दिया रमेश भुवड (१६) व तेजल संदीप पाष्टे (२०), रिया रामचंद्र वेलोंडे (१२), स्नेहल संदीप पाष्टे (२३) आणि उषा गुणाजी पाष्टे (५६) जखमी झाले आहेत. सर्वांना आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त कळताच गुहागरचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पाेलिस अधिकारी राजेंद्र राजमानेही घटनास्थळी दाखल झाले हाेते. पाेलिसांनी तातडीने मदत कार्य करुन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद गुहागर पाेलिस स्थानकात करण्यात आली आहे.