मिनी महाबळेश्वर दापोलीचा पारा चढला, वीस वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 16:47 IST2022-04-23T16:46:50+5:302022-04-23T16:47:36+5:30
कधीकाळी ब्रिटिशांनाही थंड हवेचे ठिकाण म्हणून दापोलीची भुरळ पडली होती. परंतु अलीकडे होत असलेल्या तापमान वाढीमुळे मिनी महाबळेश्वर ही दापोलीची ओळख पुसली जात आहे.

मिनी महाबळेश्वर दापोलीचा पारा चढला, वीस वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद
दापोली : कोकणातील थंड हवेचे ठिकाण, मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतही आता पारा चांगलाच चढत आहे. गुरुवारी दापोलीमध्ये तब्बल ४०.०८ अंश इतके कमाल तर रात्री २२.०६ अंश इतके किमान तापमान नोंदवले गेले आहे.
आल्हाददायक वातावरणामुळे दरवर्षी लाखो पर्यटक दापोलीला भेट देतात. कधीकाळी ब्रिटिशांनाही थंड हवेचे ठिकाण म्हणून दापोलीची भुरळ पडली होती. परंतु अलीकडे होत असलेल्या तापमान वाढीमुळे मिनी महाबळेश्वर ही दापोलीची ओळख पुसली जात आहे.
दापोली तालुक्यात विकासाच्या नावाखाली होणारी बेसुमार जंगलतोड, मानवनिर्मित वणवे, कचऱ्याचे कोणतेही व्यवस्थापन नसल्याने शहरातील डम्पिंग ग्राऊंडला लागणारी वारंवार आग, बेसुमार वाळू उपसा, सांघिक वृक्षसंवर्धन मोहिमेचा अभाव, पाणी अडवा पाणी जिरवा, रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबतची अनास्था या आणि अशा संबंधित अनेक कारणांसह ग्लोबल वाॅर्मिंगच्या झळा बसत आहेत. त्यामुळे येथे तापमानवाढ होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
दापोलीचे अर्थकारण आंबा, काजू, करवंद, जांभूळ, सुपारी, नारळ ही पिके आणि पर्यटन यावर आधारित आहे. मात्र तापमानवाढीचा परिणाम या सर्वच गोष्टींवर होत आहे. भविष्यातही जागतिक तापमानवाढीमुळे या मिनी महाबळेश्वरकडे अधिकाधिक पर्यटक येतील, अशी अपेक्षा आहे. मात्र त्याकरिता दापोलीचे अस्तित्व टिकवण्यासाठी कृषी विद्यापीठ, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आणि तमाम नागरिकांत मानसिक बदल घडवून कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा केली जात आहे.