कोकणचे मिनी महाबळेश्वर थंडीने गारठले, पारा ७.२ अंश; बागायतदार सुखावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:39 IST2025-12-11T13:39:09+5:302025-12-11T13:39:53+5:30
दापोली : कोकणातील दापोलीसह परिसरात थंडीने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. यावर्षी थंडी उशिराने सुरू झाली असली तरी थंडीचे ...

छाया-तन्मय दाते
दापोली : कोकणातील दापोलीसह परिसरात थंडीने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. यावर्षी थंडी उशिराने सुरू झाली असली तरी थंडीचे प्रमाण अचानक वाढले आहे. मंगळवार सकाळपासून बुधवार सकाळपर्यंत दापोलीत कमाल तापमान ३२.१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ७.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
गेल्या वर्षी या तारखेला किमान तापमान १३.४ अंश व कमाल ३१.९ अंश होते. पुढील तीन दिवस कडाक्याच्या थंडीची ही लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा थेट प्रभाव महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत कोकण प्रदेशात जाणवत आहे. गेले दोन-तीन दिवस जाणवत असलेली कडाक्याची थंडी आता पुढील ३–४ दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षातील सर्वांत कमी तापमान दापोलीत नोंदवले गेले आहे.
बागायतदार सुखावले
यावर्षी थंडीने नोव्हेंबरऐवजी डिसेंबर महिन्यात आगमन केले आहे. त्यातही सुरुवातीचे काही दिवस असलेली थंडी पुन्हा गायब झाली होती. किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, गेले दोन दिवस पुन्हा सुखद अनुभव येत आहे. पारा झपाट्याने खाली आला आहे. या थंडीमुळे कोकणमधील बागायतदार सुखावले आहेत. या थंडीमुळे अधिक मोहराची अपेक्षा केली जात आहे.