परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर केल्यास वाहने जप्त; जिल्हाधिकाऱ्यांचा राजकीय पक्षांना इशारा
By शोभना कांबळे | Updated: March 21, 2024 20:10 IST2024-03-21T20:08:41+5:302024-03-21T20:10:00+5:30
आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असेही दिले निर्देश

परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर केल्यास वाहने जप्त; जिल्हाधिकाऱ्यांचा राजकीय पक्षांना इशारा
शोभना कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: रोड शो करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. दुचाकीला जास्तीत जास्त एक फूट बाय अर्धा फूट आकाराचा एकच ध्वज प्रदर्शित करण्याची परवानगी आहे. तीनचाकी, चारचाकी वाहनांवर बॅनरला बंदी, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. आवश्यक परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर करणारी वाहने जप्त केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहितेबाबत येथील अल्प बचत सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांची गुरूवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये दुचाकीचा वापर, रोड शो बाबतची नियमावली, मिरवणुका आणि निवडणूक सभांमध्ये लाऊडस्पीकर, झेंड्यांचा वापर, तात्पुरते अभियान कार्यालय, एसएमएसचा गैरवापर रोखणे याबाबतचा समावेश होता. ते म्हणाले, स्थानिक कायदे, न्यायालयाचे आदेश किंवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांच्या अधिन राहून रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत निवडणूक प्रचारासाठी वापरली जाणारी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, लाऊडस्पीकर किंवा साऊंड ॲम्लीफायर चालवता येणार नाही. न्यायालयाचे आदेश आणि स्थानिक कायद्यांच्या आधीन राहून प्रमुख रुग्णालये, ट्रॉमा सेंटर, रक्तपेढ्या आणि प्रचंड गर्दीच्या बाजारपेठांमध्ये जाणारे मार्ग टाळून, शक्य असेल तेव्हा सुट्टीच्या दिवशी किंवा गर्दी नसलेल्या वेळेत रोड शोचे वेळापत्रक ठेवावे. अपर जिल्हाधिकारी बर्गे यांनीही विविध नोडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
भयमुक्त आणि पारदर्शी वातावरण निवडणूक पार पडावी, यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी दक्ष रहायला हवे. विशेषत: आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, यावर सुरुवातीपासूनच भर द्यावा. निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, केलेले पत्रव्यवहार याविषयी सखोल अवलोकन करावे. दिलेल्या जबाबदारीची योग्यरितीने अंमलबजावणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या.