Ratnagiri: चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी गुहागरच्या तरूणास जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:54 IST2025-03-24T17:54:34+5:302025-03-24T17:54:58+5:30

चिपळूण : सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश शंकर वाघे (वय ४०, गुहागर ) याला ...

Guhagar youth sentenced to life imprisonment for abusing a child | Ratnagiri: चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी गुहागरच्या तरूणास जन्मठेप

Ratnagiri: चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी गुहागरच्या तरूणास जन्मठेप

चिपळूण : सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश शंकर वाघे (वय ४०, गुहागर) याला चिपळूण येथील जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी आज, सोमवारी जन्मठेपची शिक्षा ठोठावली. तसेच त्याला २५ हजाराचा दंड केला. ही घटना ६ ऑक्टोंबर २०१९ रोजी घडली होती.  

पीडीत चिमुकली आपल्या भावासोबत व शेजारील मुलासोबत घराशेजारी खेळत होती. त्यावेळी आरोपी प्रकाश वाघे तिथे आला व लाकडे शोधायला गुरांकडे चल असे म्हणून तिला कलांडी येथील जंगलमय भागात घेवून गेला. तेथ तिच्यावर बलात्कार करुन लैंगिक अत्याचार केला. पीडीत मुलीने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत सरळ घर गाठले आणि घडलेली घटना आईला सांगितली. 

त्यानंतर तीच्या आईने गुहागर पोलिस स्थानकात आरोपीविरुध्द तक्रार दिली होती. त्यानुसार या प्रकरणी वाघे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा सखोल तपास करुन पोलिसांनी आरोपीविरुध्द तातडीने दोषारोपपत्र दाखल केले होते. या फौजदारी खटल्याची सुनावणी चिपळूण येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्या समोर झाली. 

१० साक्षीदार तपासून सबळ पुरावा न्यायालयासमोर सादर

सरकार पक्षातर्फे आरोपीचा गुन्हा शाबीत करण्याकरीता सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी या प्रकरणी १० साक्षीदार तपासून सबळ पुरावा न्यायालयासमोर सादर केला. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांची साक्ष महत्वाची ठरली. बचाव पक्षातर्फे आरोपीने स्वतः न्यायालयासमोर साक्ष दिली. त्यानंतर दोन्ही बाजुच्या वकीलांनी युक्तीवाद केला. अंतिम युक्तीवादानंतर चिपळूण येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी सरकार पक्षाचा सखोल युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी प्रकाश वाघे याला भा. द. वि. कलम ३७६ (अ, ब) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम ५ सह ६ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

आईवडील, नातेवाईक, नागरिकांतून समाधान

या शिक्षेमुळे पीडीत मुलीला न्याय मिळाल्याबाबत तिचे आईवडील, नातेवाईक, नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याप्रकरणी सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी सरकारपक्षातर्फे न्यायालयात भक्कम बाजू मांडली. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार प्रदिप भंडारी यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस निरीक्षक सचिन सावंत व पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे यांनी सहकार्य केले.

Web Title: Guhagar youth sentenced to life imprisonment for abusing a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.