इंडिया आघाडी-महायुतीत थेट लढत, कोण करणार रायगड सर? अनंत गीते-सुनील तटकरे आमनेसमाने
By राजेश भोस्तेकर | Updated: April 4, 2024 13:16 IST2024-04-04T13:15:01+5:302024-04-04T13:16:06+5:30
Raigad lok sabha constituency: पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा पाच वर्षांने आलटून पालटून विजयी झेंडा फडकला जात होता. २००८ नंतर कुलाबाचा रायगड लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला.

इंडिया आघाडी-महायुतीत थेट लढत, कोण करणार रायगड सर? अनंत गीते-सुनील तटकरे आमनेसमाने
-राजेश भोस्तेकर
अलिबाग - पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा पाच वर्षांने आलटून पालटून विजयी झेंडा फडकला जात होता. २००८ नंतर कुलाबाचा रायगड लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर २००९, २०१४ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला होता. शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले होते. २०१९ ला मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले. यावेळी इंडिया आघाडी-महायुतीत थेट लढत होत आहे. त्यामुळे रायगडचा किल्ला कोण सर करणार, याबाबत उत्सुकता आहे.
गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली. रायगडचीही समीकरणे बदलली आहेत. यंदा इंडिया आघाडीकडून उद्धवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्य सुनील तटकरे हे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
एकेकाळी काँग्रेस, शेकापचे वर्चस्व
एकेकाळी या मतदारसंघावर काँग्रेस आणि शेकापचे वर्चस्व होते. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी सर्वाधिक सहावेळा कुलाबा आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. ‘शेकाप’ने पाचवेळा तर शिवसेनेने दोनवेळा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा येथे प्रतिनिधित्व केले आहे.
आधी सोबत, आता विरोधात
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप अशी महाआघाडी तर शिवसेना, भाजप युती अशी लढत झाली होती. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आता महायुतीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, भाजप अशी महायुती झाली आहे. तर शेकाप, उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, अशी इंडिया आघाडीची मोट आहे. २०१९ मध्ये जे सोबत होते, आता ते वेगळे झाले आहेत. जे विरोधात होते ते एकत्र आले आहेत. त्यामुळे लढत रंगतदार होणार आहे.
अनिल तटकरे विरोधात
सुनील तटकरे यांचे मोठे बंधू माजी आमदार अनिल तटकरे यांच्याकडे शरद पवार गटाचे राज्याचे उपाध्यक्षपद दिले आहे. त्यामुळे ते सुनील तटकरेंच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
भाजपही होती इच्छुक
रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची भाजपतर्फे पूर्ण तयार झाली होती. शेकापमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार धैर्यशील पाटील निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. जिल्ह्यातील भाजप नेत्यांनीही वरिष्ठ पातळीवर भाजपला रायगडची जागा मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ही जागा मिळाली.