नगराध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत वाद पेटला; “सन्मान न दिल्यास आम्हीही कोलू” गारटकरांचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:25 IST2025-11-14T14:23:30+5:302025-11-14T14:25:11+5:30
गेल्या काही दिवसांपासून मंत्री भरणे आणि गारटकर यांच्यातील मतभेद उघडपणे दिसत असून, नगराध्यक्षपदाची उमेदवारी हे दोघांमधील वादाचे केंद्रबिंदू बनले आहे.

नगराध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत वाद पेटला; “सन्मान न दिल्यास आम्हीही कोलू” गारटकरांचे वादग्रस्त वक्तव्य
इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केलेले वादग्रस्त विधान चर्चेचा विषय ठरले आहे. “आमची पहिली पसंती पक्षाला आहे; पण पक्षाने सन्मान न दिल्यास आणि आम्हाला कोलल्यास, आम्हीही पक्षाला ‘कोलल्याशिवाय’ राहणार नाही,” असे गारटकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यातून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरच अप्रत्यक्ष टीका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री भरणे आणि गारटकर यांच्यातील मतभेद उघडपणे दिसत असून, नगराध्यक्षपदाची उमेदवारी हे दोघांमधील वादाचे केंद्रबिंदू बनले आहे. गारटकर यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी पक्षाशी निष्ठावंत असलेल्या जुन्या आणि सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदासाठी संधी द्यावी, अशी भूमिका मांडली आहे. त्यासाठी त्यांनी बाळा ढवळे, अमर गाडे आणि वसंत माळुंजकर या कार्यकर्त्यांची नावे सुचवली आहेत. गारटकर यांचे म्हणणे आहे की, “यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ.”
भरणे गटाची पसंती भरत शहा यांना
दुसरीकडे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरत आहेत. भरत शहा यांना पक्षात सामील करण्यास गारटकर यांनी विरोध केला नसला, तरी “त्यांना लगेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची गरज नाही,” असे त्यांचे मत आहे.
‘सत्तेसाठी नव्हे तर कार्यकर्त्यांसाठी’ लढा
गारटकर यांनी आजवर अनेक सामान्य घरातील कार्यकर्त्यांना नगरसेवक आणि नगराध्यक्ष होण्यासाठी संधी दिल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. “सत्तेसाठी नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी ही भूमिका घेतली गेली आहे,” असे मत त्यांच्या गटाकडून व्यक्त करण्यात आले. दरम्यान, गारटकर यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूरमधील संघटनेत गलबला उडाला असून, पक्षातील मतभेद अधिक चव्हाट्यावर आले आहेत. पुढील काही दिवसांत पक्षाच्या उमेदवार निवडीवरून परिस्थिती आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.