"तुम्हालाच नाईलाजाने आमची विचाराधारा स्वीकारावी लागतेय, हेच सत्य", आशिष शेलारांना अमोल मिटकरींचे खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:14 IST2026-01-06T15:12:18+5:302026-01-06T15:14:55+5:30
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावे लागली, असे विधान केले. याच विधानावर बोट ठेवत मिटकरींनी शेलारांना डिवचले.

"तुम्हालाच नाईलाजाने आमची विचाराधारा स्वीकारावी लागतेय, हेच सत्य", आशिष शेलारांना अमोल मिटकरींचे खडेबोल
"तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो, तरी आमच्या पक्षाची विचारधारा तुम्हाला नाईलाजाने का होईना स्वीकारावीच लागते", अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाचे नेते आशिष शेलारांना सुनावले. सावरकरांचा विचार स्वीकारावाच लागेल, असे विधान शेलारांनी केले होते, त्यावरून मिटकरींनी पलटवार केला.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीत असलेल्या अजित पवार यांच्यासोबतच भाजपाच्या ठिणग्या उडताना दिसत आहे. अजित पवारांकडून पुणे महापालिकेतील कारभारावरून भाजपावर टीका केली जात आहे. त्याला भाजपाकडून उत्तर दिले जात आहे. त्यातच आता आशिष शेलारांनी सावरकरांच्या विचारांचा मुद्दा पुढे आणला.
अमोल मिटकरींनी आशिष शेलारांना काय उत्तर दिले?
आमदार अमोल मिटकरी यांनी एक पोस्ट करत म्हटले की, "प्रिय आशिष शेलारजी, दादा व दादांचा पक्ष तुमच्या 'आदर्शांच्या' नेतृत्वावरच चालला पाहिजे; हा जो तुमचा अट्टाहास आहे व हे जे तुम्ही ठासून सांगत आहात त्यात किती तथ्य आहे, हे तुम्हालाच माहीत."
"तूर्तास इतकंच सांगेन आम्ही 'शिव-शाहू-फुले-आंबेडकरी' चळवळीशी बांधिल व प्रामाणिक होतो, आहोत आणि राहू. तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो, तरी आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजाने का होईना स्वीकारावीच लागते, हे त्रिवार सत्य आहे. जय शिवराय, जय भीम", अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला.
आशिष शेलार, सावरकर विचार आणि अजित पवारांबद्दल काय बोलले?
पुण्यात माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. "आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकर विचारांवर चालणारे लोक आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर तुमच्या बरोबर, आले नाहीत, तर तुमच्याविना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचे काम करू", असे शेलार म्हणाले होते.
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा-राष्ट्रवादी (अजित पवार) संघर्ष
राज्यात आणि केंद्रात एकत्र असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय संघर्ष वाढला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. त्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत.