निवडणूक आयोगाला ‘मॅनेज’ का करतात? मतदारांना विकत का घेतात? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 20:22 IST2026-01-10T20:21:28+5:302026-01-10T20:22:25+5:30
अजित पवारांनी भाजपला महाभ्रष्टाचारी पक्ष म्हटले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, सरकारचा पाठिंबा काढावा, मग खुशाल भाजपवर आरोप करावेत

निवडणूक आयोगाला ‘मॅनेज’ का करतात? मतदारांना विकत का घेतात? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
पुणे : भाजप पक्ष मजबुत आहे, बलाढ्य आहे, असे बोलले जाते. असे असेल तर मग ते रडीचा डाव का खेळतात. निवडणूक आयोगाला ‘मॅनेज’ का करतात, मतदारांना विकत घेण्याची, बोगस मतदान करण्याची वेळ त्यांच्यावर का येते. खरे तर भाजप हा दुबळा व विकलांग पक्ष आहे, त्यामुळेत त्यांच्यावर व्यवस्थेचा गैरवापर करण्याची आणि दुसऱ्या पक्षातील नेते घेण्याची वेळ येते, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धान सपकाळ यांनी केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. यावेळी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रदेश वरिष्ठ खजिनदार ॲड. अभय छाजेड, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेविका नीता रजपूत उपस्थित होते. नगरपालिका निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांनी काय काय केले हे सर्वांनी पाहिले. मतदार यादीतील घोळ कायम असून निवडणूक आयोगाचा धाक उरलेला नाही. आचारसंहिता पाळली जात नाही. जिल्हादंडाधिकारी व पोलिस काम करत नाहीत. त्यामुळे राज्यात खुल्या वातावरणात पारदर्शी पद्धतीने निवडणूक होतच नाही.
‘निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कामाबद्दल सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपाबद्दल आरोप केल्यास आम्हाला ‘रडीचा डाव‘ म्हणून डिवचले जाते. मात्र, नियम पाळून पारदर्शी पद्धतीने निवडणूक झाल्यास त्याचा निकाल स्वीकारायला आम्ही तयार आहोत. इतकेच काय चुकीच्या पद्धतीने झालेल्या निवडणुकांचा निकालही आम्ही स्वीकारला आहे, असे सपकाळ म्हणाले. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक करण्यामुळे भाजपसह सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. लाडकी बहीण, बेटी बचााओ घोषणा देणाऱ्या महायुतीला गुंडांची, बलात्काऱ्यांची गरज का भासते आहे ? मंत्री असंवेदनशील विधाने करत आहेत. हे सरकारच्या मानसिकतेचे निदर्शक असून लोकशाही गुंडाळणे हाच त्यांचा गाभा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस लाचार का आहेत?
अजित पवारांनी भाजपला महाभ्रष्टाचारी पक्ष म्हटले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, सरकारचा पाठिंबा काढावा, मग खुशाल भाजपवर आरोप करावेत. अजित पवारांचा आरोप सहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का सहन करत आहेत, ते लाचार का झाले आहेत ? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. अजित पवार यांना पार्थ पवारांच्या घोटाळ्याबद्दल विचारले की ते ‘जय जिनेंद्र, जय जैन बोर्डिंग’ म्हणतात. याचाच अर्थ आम्हीही भ्रष्ट आणि भाजपही भ्रष्ट’ त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
कुंभ मेळ्याचे टेंडर देण्याचे आमीष दाखवून फोडाफोडी
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली वृक्षतोड करून त्यात खाल्ले जात आहे. मंत्री गिरीश महाजन पक्ष फोडण्यासाठी कुंभ मेळ्याचे टेंडर देण्याचे आमिष दाखवत आहेत. त्यांना वृक्षतोड केवळ पैसे खाण्यासाठीच करायची आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.
फडणवीसांची नार्को टेस्ट करावी
राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था, गुंडगिरी, फोन टॅपिंग, घोटाळे, जाती-धर्मातील वाद यातील ‘कळीचा नारद’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. त्यांनीच विरोधी पक्षात असताना ‘फोन टॅपिंग’ करून आपल्याला माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला सत्ता आल्यानंतर पोलिस महासंचालक केले. गुप्तवार्ता विभागाचा राजकीय वापर केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचीच ‘नार्को टेस्ट’करा, त्यातून सर्व काही उघड होईल, अशी मागणी सपकाळ यांनी केली.