पुणे म्हंटल्यावर चर्चा, वादविवाद होतातच, पण काळजीचे कारण नाही; गणेश मंडळांचे वाद मिटतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:57 IST2025-08-09T11:56:45+5:302025-08-09T11:57:28+5:30
दरवर्षी वाद निर्माण होतातच व मिटतात, राज्य सरकारने मध्यस्थी करण्याची काहीही गरज नाही. चर्चेअंती पुणेकरांमध्ये एकमत होईल.”

पुणे म्हंटल्यावर चर्चा, वादविवाद होतातच, पण काळजीचे कारण नाही; गणेश मंडळांचे वाद मिटतील
पुणे : विसर्जन मिरवणुकीच्या वेळेवरून पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये निर्माण झालेला वाद लवकरच मिटेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व आमदार हेमंत रासने यासंदर्भात संबधितांबरोबर बोलतील, असे त्यांनी सांगितले. पुणे म्हटले की वाद होणारच, अशी मिश्कील टिपणीही त्यांनी यावेळी केली.
पुण्यातील मानाचे ५ गणपती सकाळी १० वाजता मंडईतून पुढे निघतात व त्यानंतरच मिरवणूक सुरू होते. ते पुढे ५ वाजपर्यंत लक्ष्मीरस्त्यावर रेंगाळत असतात. त्यामुळे मिरवणुकीला विलंब होतो असा आक्षेप घेत विसर्जन मिरवणूक सकाळी ७ वाजता सुरू करावी, असा काही सार्वजनिक मंडळांनी आग्रह धरला आहे. त्यावरून गणेशोत्सव सुरू होण्याआधीच वाद सुरू झाले आहेत.
याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी उत्सवाआधीच हे वाद मिटतील असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “पुणे म्हंटल्यावर चर्चा, वादविवाद होतातच, पण काळजी करण्याचे कारण नाही. केंद्रीय मंत्री मोहोळ व आमदार रासने यासंदर्भात सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेणार आहेत. मंडळांचे पदाधिकारी एकत्र बसून यावर निर्णय घेतील. दरवर्षी वाद निर्माण होतातच व मिटतातही. यात राज्य सरकारने मध्यस्थी करण्याची काहीही गरज नाही. चर्चेअंती पुणेकरांमध्ये एकमत होईल.”