दौंडच्या सहजपूरमध्ये शेतात आढळला अज्ञात मृतदेह; डोक्यात हत्याराने वार केल्याच्या जखमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 17:31 IST2022-01-11T17:30:54+5:302022-01-11T17:31:05+5:30
पुणे - सोलापूर महामार्गालगत असलेल्या मोकळ्या शेतात मृतदेह आढळून आला असून याबाबतचा तपास सुरु आहे

दौंडच्या सहजपूरमध्ये शेतात आढळला अज्ञात मृतदेह; डोक्यात हत्याराने वार केल्याच्या जखमा
यवत : दौंड तालुक्यातील सहजपूर गावच्या हद्दीत शेतात एका अज्ञात पुरुषाचा खून करून टाकलेला मृतदेह यवत पोलिसांना आढळून आला आहे. याबाबत अविनाश परशुराम होले ( रा.होले वस्ती, सहजपूर, ता. दौंड ) यांनी यवत पोलिसात फिर्याद दिली आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे - सोलापूर महामार्गालगत असलेल्या मोकळ्या शेतात मृतदेह आढळून आला असून याबाबतचा तपास सुरु आहे. सोमवार सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अज्ञात इसमांनी मृत व्यक्तीच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने वार करून जीवे मारत सदर ठिकाणी टाकले आहे. त्या मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० असून डोक्याला काळे केस, दाढी काळी पंढरी वाढलेली, मिशा काळ्या पांढऱ्या मोठ्या, अंगात तपकिरी व पिवळ्या रंगाचा चौकडी फुल शर्ट निळ्या रंगाची पॅंट, जवळच गुलाबी रंगाचा टॉवेल व काळ्या रंगाच्या चपला असे सविस्तर वर्णन आहे. सदर घटनेतील मृत व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास यवत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.