त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि...! दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:04 IST2025-08-28T15:02:38+5:302025-08-28T15:04:28+5:30

मन शांत करणारा ओंकार जप, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले

Tvameva Prakashthi Tattvamasi 35 thousand women recite Atharvashirsha in front of Dagdusheth Ganapati Awakening of women's power in the morning on the occasion of Rishi Panchami | त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि...! दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर

त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि...! दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर

पुणे : श्री गणेशाय नमः .. नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि .. या अथर्वशीर्षच्या जयघोषाने दगडूशेठ गणपतीचा परिसर दुमदुमून गेला. तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला वंदन केले. विशेष म्हणजे, पाऊस असला तरी पारंपरिक वेशभूषेत मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता सहभागी होण्यासाठी हजेरी लावली. ॠषीपंचमीदिनी उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, न्यायाधीश किरण क्षीरसागर, प्रसेनजीत फडणवीस, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महिलांनी मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. मोरया मोरया दगडूशेठ मोरया... असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या.

परदेशी अभिनेत्रीची पठणाकरिता उपस्थिती

पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्याला ऍना मारा या इटली येथील अभिनेत्रीने देखील हजेरी लावत सहभाग घेतला.

Web Title: Tvameva Prakashthi Tattvamasi 35 thousand women recite Atharvashirsha in front of Dagdusheth Ganapati Awakening of women's power in the morning on the occasion of Rishi Panchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.