यंदा गणेशोत्सवात गोंडस, निरागस बालगणेशाची जादू सर्वत्र; घरोघरी बालगणराय होणार विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:27 IST2025-08-23T11:27:22+5:302025-08-23T11:27:59+5:30

फेटे, पगड्या, बासरी, त्रिशूल, मोरपिसं आणि कलात्मक दागिन्यांनी सजलेले गणेशरूप विशेष आकर्षण ठरत आहे

This year, the magic of cute, innocent Bal Ganesh will be everywhere during Ganeshotsav; Bal Ganesh will be present in every household | यंदा गणेशोत्सवात गोंडस, निरागस बालगणेशाची जादू सर्वत्र; घरोघरी बालगणराय होणार विराजमान

यंदा गणेशोत्सवात गोंडस, निरागस बालगणेशाची जादू सर्वत्र; घरोघरी बालगणराय होणार विराजमान

पुणे: लाडक्या बाप्पांचे अवघे काही दिवसांत घरोघरी आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर यंदा गोंडस, निरागस बालगणेशाची जादू सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. बासरी वाजवणाऱ्या, खेळकर रूपात सजलेल्या बालगणेशाच्या मूर्ती भाविकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत बालगणेशाची क्रेझ इतकी वाढली आहे की प्रत्येकाला आपल्या घरात बालगणेशाचीच मूर्ती हवी आहे.

यंदा मूर्तिकारांनी बालगणेशाच्या सजावटीत विशेष कलात्मकता दाखवली आहे. यावर्षी फेटे, पगड्या, बासरी, त्रिशूल, मोरपिसं आणि कलात्मक दागिन्यांनी सजलेले गणेशरूप विशेष आकर्षण ठरत आहेत. पूर्वी केवळ मखमली शेला व रंगसंगती पुरेशी होती, पण आज मूर्तिकार कोल्हापुरी, शिंदेशाही, पेशवाई आणि राजस्थानी फेट्यांनी सजवून गणेशमूर्तींना एक वेगळा देखणा स्पर्श देत आहे. या बालगणेश मूर्तीमध्ये वारकरी गणेश, कृष्णरूप बाप्पा, शंकररूप बालगणेश, मोर व गरुडावर विराजमान झालेले गणराय अशा वैविध्यपूर्ण मूर्तींसह बालगणेशाने बाजारपेठ सजली असून भक्तांना आकर्षित करत आहे.

परंपरेतून उमलणारी आधुनिकतेची झलक आणि बालगणेशाची निरागस रूपे यंदाचा गणेशोत्सवात अधिकच गोड आणि भावस्पर्शी ठरणार आहे. मूर्तींच्या नव्या स्वरूपामुळे भक्तीत एक वेगळीच झळाळी दिसून येते. गोंडस बालगणेशासोबतच वैविध्यपूर्ण मूर्तींच्या उपस्थितीमुळे यंदाचा गणेशोत्सव पुणेकरांसाठी अधिक रंगतदार आणि संस्मरणीय ठरणार हे निश्चित आहे.

गेल्या काही वर्षांत संकल्पनात्मक मूर्तींना चांगली मागणी आहे. यंदा बालगणेशाची मागणी एवढी प्रचंड वाढली आहे की आम्हाला अक्षरशः वेगवेगळ्या रूपातील बालगणेश साकारावे लागत आहेत. शंकरांच्या रूपातील बालगणेश, मोरपिसांनी सजलेला बालगणेश प्रत्येक भाविकाला आपल्या घरात वेगळा गोंडस बाप्पा हवा आहे.
- लोकेश बापट, मूर्तिकार.

Web Title: This year, the magic of cute, innocent Bal Ganesh will be everywhere during Ganeshotsav; Bal Ganesh will be present in every household

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.