राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबाबत विश्वासार्हता आता राहिली नाही; सचिन अहिर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:37 IST2025-12-29T15:36:34+5:302025-12-29T15:37:30+5:30
शरद पवार पक्ष आमचे सहकारी पक्ष असून ते सोबत राहतील असा विश्वास पुणेकरांना होता तो आता कुठं राहिलेला नाही

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबाबत विश्वासार्हता आता राहिली नाही; सचिन अहिर यांची टीका
पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे राष्ट्रवादीशिवायच बोलणी पूर्ण करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. त्यात काँग्रेसला १०० जागा तर उद्धवसेनेला ६५ जागा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या दोन्ही पक्षाच्या जागावाटपाची आणि आघाडीची घोषणा आज झाली आहे. त्यापैकी १०५ जागांचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी लोकमतशी संवाद साधताना दिली.
अहिर म्हणाले, १६५ जागा लढायचा आज फॉर्मुला ठरला आहे. त्याचा एक भाग म्हणून घेऊन ४५ जागा आम्ही आज देणार आहोत तर ६० जागा ते देणार आहेत. आजच्या रात्रीच्या रात्री सर्वांना आम्ही AB form देण्याचा निर्णय घेणार आहोत. आता १०५ जागांचे वाटप झाले आहे. आमच्या घटक पक्षांना आम्ही जागा द्यायच्या आहेत. कुठं देणार हेही बैठकीत स्पष्ट झाले आहे.
शरद पवार पक्षाने राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाशी युतीचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, शरद पवार पक्ष आमचे सहकारी पक्ष आहेत. तो एक पक्ष म्हणून सोबत राहतील असा विश्वास पुणेकरांना होता. तो आता कुठं राहिलेला नाही. त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून एक जबाबदारी घेऊन पूर्ण १६५ जागेवर उमेदवार देत आहोत. पुण्याच्या हितासाठी आणि ज्यांना ज्यांना हे बदल पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही हे करत आहोत. मनसेचा जागांची मागणी होती. त्यापैकी वीस एकवीस जागा आज देत आहोत. अजून काही जागेची चर्चा दुपारपर्यंत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुणेकरांसमोर आम्ही ट्राफिक गुन्हेगारी हे घेऊन जाणार आहोत. तसेच ज्या पद्धतीने आम्ही ५ वर्षात मुंबई महानगरपालिका चालवलेली आहे. त्यांना दिलेले शब्द किती पाळलेले आहेत याचं सादरीकरण स्वतः आदित्य ठाकरे यांनी येऊन इकडे करण्याचं काम केलं. हे सर्व मुद्दे घेऊन पुणेकरांकडे आम्ही जाणार आहोत.