शिंदेसेनेला नेमक्या जागा किती मिळतील याचा निर्णय मुंबईतच; नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 20:24 IST2025-12-27T20:23:10+5:302025-12-27T20:24:32+5:30
भाजप १५ जागांवरच अडून राहिला तर पुढे काय पर्याय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे असे म्हणत गोऱ्हे यांनी आम्ही युतीबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली

शिंदेसेनेला नेमक्या जागा किती मिळतील याचा निर्णय मुंबईतच; नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण
पुणे : महापालिका निवडणुकीतील जागा वाटपावरून शिंदेसेनेत नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. शिंदेसेनेने भाजपकडे २५ जागांची मागणी केली असून, याबाबत भाजपचे नेते मात्र हा आकडा मुंबईतच अंतिम करण्यात येईल असे सांगत आहेत. शिंदेसेनेकडून याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे शिंदेसेनेला नेमक्या जागा किती मिळतील याचा निर्णय हा मुंबईतच होईल हे आता स्पष्ट झाले आहे. याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील दुजोरा दिला आहे.
शिंदेसेनेतील इच्छुक उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. २६) डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. शनिवारी (दि. २७) गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. भारतीय जनता पक्षाकडून शिंदेसेनेला शहरात १५ जागा दिल्या होत्या, त्या स्वीकाराहार्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उदय सामंत यांनी २५ जागांची यादी माझ्याकडे पाठविली होती. त्यासंदर्भातील पत्र मी भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हा निर्णय शहर पातळीवर घेता येणार नसल्याचे कळविल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच याबाबतची माहिती एकनाथ शिंदे यांना दिल्याचेदेखील त्या म्हणाल्या. त्यामुळे आता जागा वाटपांचा निर्णय मुंबईतच होईल असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
शहरात भाजप-शिंदेसेना युती होणार की नाही, या प्रश्नावर बोलताना त्यांनी याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतील असेही त्यांनी सांगितले. मात्र, जर भाजप १५ जागांवरच अडून राहिला तर पुढे काय पर्याय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे असे म्हणत गोऱ्हे यांनी आम्ही युतीबाबत सकारात्मक अपेक्षा ठेवतो आहोत, असेही स्पष्ट केले.