राष्ट्रवादी शरद पवार पक्षामुळे घोळ संपेना; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आज आघाडीची घोषणा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:55 IST2025-12-29T11:53:50+5:302025-12-29T11:55:15+5:30
‘कोणाचीही वाट पाहू नका, पुढे जा,’ असा सल्ला उद्धवसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे

राष्ट्रवादी शरद पवार पक्षामुळे घोळ संपेना; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आज आघाडीची घोषणा?
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीच्या जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या बैठकीला अचानकपणे राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या पक्षातील कोणताही पदाधिकारी उपस्थित राहिले नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला असून दोन्ही पक्षाच्या आघाडीची घोषणा सोमवारी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी महापौर अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी बारामती होस्टेलवर भेट घेतली. त्यावेळी जागावाटप आणि ‘घड्याळ की तुतारी?’ या चिन्हावर निवडणूक लढविण्यावर चर्चा झाली होती. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्याचे ठामपणे सांगितले होते. राष्ट्रवादीला (शरद पवार) केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव शरद पवार गटाने पूर्णपणे अमान्य केला होता. त्यामुळे चर्चा फिस्कटली. त्यानंतर दोन दिवस राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहत होते. शनिवारी रात्रीपासून अचानकपणे राष्ट्रवादीचे (शरद पवार) कोणतेही पदाधिकारी काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) यांना बैठकीला बोलवायचे नाही, अशी भूमिका काँग्रेस आणि उद्धवसेनेने घेतली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात पालिका निवडणूक पुन्हा एकत्रित लढविण्याविषयी चर्चा झाली. यात एकाच चिन्हावर लढणे किंवा प्रभागानुसार ज्या पक्षाचे अधिक उमेदवार त्याचे चिन्ह या दोन सूत्रांवर चर्चा झाली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ४० ते ४५ जागा व उर्वरित जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला याबाबत चर्चा झाली. मात्र, एकमत झाले नाही. या संदर्भात पुन्हा बैठक होऊन सोमवारी आघाडीची अधिकृत होण्याची शक्यता आहे.
कोणाचीही वाट पाहू नका
पुणे महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाबाबतच्या महाविकास आघाडीच्या नियोजित बैठकीला राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे कोणीही पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्याबाबत उद्धवसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली. त्यावर ‘कोणाचीही वाट पाहू नका, पुढे जा,’ असा सल्ला वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षामुळे घोळ संपेना
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाबरोबर चर्चा करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचा घोळ अद्यापही संपत नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी बरोबर, काँग्रेस आणि उद्धवसेनेमधील इच्छुक संभ्रमात आहेत.