तनिषा भिसे यांच्या नणंदेला पुण्यात भाजपकडून उमदेवारीची शक्यता; 'या' भागातून लढण्यास इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:04 IST2025-12-25T18:00:30+5:302025-12-25T18:04:45+5:30
प्रियंका भिसे यांना उमेदवारी दिल्यावर त्या भागातील लोकांची भावनिक साद मिळण्याची शक्यता आहे

तनिषा भिसे यांच्या नणंदेला पुण्यात भाजपकडून उमदेवारीची शक्यता; 'या' भागातून लढण्यास इच्छुक
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली होती. या घटनेत सूर्या, इंदिरा आणि मणिपाल या खासगी हॉस्पिटल्सवरही संशयाचे सावट गडद झाले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात चौकशांसाठी चार समित्या नेमल्या गेल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरणाने खळबळ उडाली होती. त्या हॉस्पिटल प्रशासनाला राजकीय नेते, विरोधक सर्वानी धारेवर धरले होते. या गंभीर प्रकरणात भिसे कुटुंबियांच्या वतीने आवाज उठवणाऱ्या तनिषा यांच्या नणंद प्रियंका यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका भिसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३२ (पाप्युलरनगर-वारजे) भागातून प्रियंका भिसे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रियंका यांनी दीनानाथ रुग्णालयावर पैसे मागितल्याचे आरोप करत भिसे कुटुंबीयांकडून आवाज उठवला होता. तसेच त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने सखोल चौकशीला सुरुवात केली होती. प्रियंका भिसेही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
पुण्यात सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. अन्य पक्षातील पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. त्यामुळे बऱ्याच भागात भाजपची ताकद वाढली आहे. अशातच वारजे भागात प्रियंका भिसे यांच्या उमेदवारीची चर्चा होऊ लागली आहे. तनिषा भिसे प्रकरणाने भिसे कुटुंबियांना नागरिकांची भावनिक साद मिळाली होती. उमेदवारी दिल्यावर पुन्हा एकदा त्यांना त्या भागातील लोकांची भावनिक साद मिळण्याची शक्यता आहे. अजून तरी पक्षाकडून अधिकृत त्यांचे नाव समोर आले नाहीये. परंतु तनिषा भिसे यांचे पती पूर्वीपासून भाजपचे काम करत असल्याने या उमेदवारीच्या शक्यता वाढल्या आहेत.