४८ तासांत तपशील सादर करा! बारणेंच्या खर्चात १५ लाखांची, तर वाघेरेंच्या खर्चात ७ लाखांची तफावत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 02:21 PM2024-05-16T14:21:00+5:302024-05-16T14:25:01+5:30
उमेदवारांनी रोजचा प्रचार खर्च नोंदविणे आवश्यक आहे. दैनंदिन खर्च तपासणीवेळी खर्च अहवाल सादर न करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार नोटीस बजावण्यात येत आहे...
पिंपरी : उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तिसऱ्या तपासणीत खासदार श्रीरंग बारणे यांच्या खर्चात १५ लाख तर संजोग वाघेरे यांच्या खर्चात सात लाखांची तफावत आढळून आली. त्यामुळे त्यांना नोटीस बजावत तफावतींच्या रकमेचा ४८ तासांत खुलासा करा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिला आहे.
उमेदवारांनी रोजचा प्रचार खर्च नोंदविणे आवश्यक आहे. दैनंदिन खर्च तपासणीवेळी खर्च अहवाल सादर न करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार नोटीस बजावण्यात येत आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली शुक्रवारी (दि. ३), दुसरी तपासणी मंगळवारी (दि. ७) आणि तिसरी तपासणी शनिवारी (दि. ११) झाली. निवडणूक खर्च तपासणीमध्ये प्रथम तपासणीवेळी खर्च सादर न करणाऱ्या ६ उमेदवारांना, तर निवडणुकीतील दैनंदिन खर्च तपासणीकरिता सादर केला असताना त्यात आढळून आलेल्या तफावतीबाबत ३ उमेदवारांना नोटीस बजावली होती. दुसऱ्या तपासणीवेळी खर्च सादर न करणाऱ्या २ उमेदवारांना तर योग्य बँक खात्यांमधून निवडणुकीचा खर्च न केल्याबद्दल एका उमेदवाराला नोटीस बजावली होती. तिसऱ्या तपासणीला खर्च न सादर केल्याबद्दल ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे शिवाजी जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस बजावण्यात आली आहे.
शिंदेसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि उद्धवसेनेचे उमेदवार संंजोग वाघेरे यांनी तिसऱ्या तपासणीत खर्च सादर केला असता त्यांच्या आणि निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी नोंदवलेल्या खर्चात तफावत आढळली आहे. निवडणूक खर्च तपासणीनंतर बारणे यांच्या निवडणूक खर्चातील तफावत १५ लाख १९ हजार रुपये इतकी आढळली आहे. उद्धवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या निवडणूक खर्चातील तफावत सात लाख ३० हजार ८५२ रुपये इतकी आहे.
अशी आढळली तफावत..
उमेदवार, निवडणूक निरीक्षकांकडे असलेला खर्च, उमेदवाराने दाखवलेला खर्च, तफावत
श्रीरंग बारणे : ५९ लाख १६६ : ४३ लाख ८१ हजार १६६ : १५ लाख १९ हजार
संजोग वाघेरे : ५७ लाख १२ हजार ५४२ : ४९ लाख ८१ हजार ६९० : ७ लाख ३० हजार ८५२