विघ्नसंतोषी भूमिकेची कीव येते,आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही: महापौर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 21:28 IST2020-08-24T21:22:32+5:302020-08-24T21:28:05+5:30
पुण्यात काय पण जगात कुठलाही हिंदू कचऱ्याच्या कंटेनर मध्ये गणेश विसर्जन करणार नाही..

विघ्नसंतोषी भूमिकेची कीव येते,आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही: महापौर
पुणे : घरातील गणपतीचे घरातच विसर्जन करा या आवाहनाला पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण अशावेळी खोटे आरोप करून काही विघ्नसंतोषी मंडळी घाणेरडी भूमिका मांडत आहेत, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, अशा शब्दांत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फटकारले.
पुण्यात काय पण जगात कुठलाही हिंदू कचऱ्याच्या कंटेनर मध्ये गणेश विसर्जन करणार नाही. पुणे महापालिकेने फिरत्या हौदाचे काम ज्या एजन्सीला दिले होते, त्या एजन्सीने गेल्या वर्षीचे गणेश विसर्जन करिता वापरले गेलेले केवळ दोन हौद यावेळी वापरले होते. वर्षभर गोडाऊन मध्ये वापरा विना पडून राहिल्याने, त्यांचा रंग उडाला होता व त्या हौदाना चिखल लागलेला होता. असे स्पष्टीकरण देत मोहोळ यांनी, ते कचऱ्याचे कंटेनर नव्हते असा दावा केला आहे.
गतवर्षी दीड दिवसाच्या १४ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. यावर्षी ३० फिरत्या हौदाच्या माध्यमातून केवळ १ हजार २०० मूर्तींचे विसर्जन झाले असून, १२ हजार ८०० मूर्तींचे घरच्या घरीच विसर्जन झाल्याचे सांगून, मोहोळ यांनी पुणेकरांचे आभार मानले. तसेच ५ व्या, ७ व्या व १० व्या दिवशीही घरच्या गणपती चे घरीच विसर्जन करावे असे आवाहन केले.
आपल्या शहराचे नाव खराब होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे. छोटा विचार, छोटी शक्ती, छोटी क्षमता असलेल्या व्यक्ती याबाबत बोलत असले तरी त्याकडे आम्ही लक्ष देत नाही असेही मोहोळ म्हणाले.
--------
विसर्जन हौद प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
गणेश विसर्जन करण्याकरिता फिरत्या हौद रथात टाक्यांऐवजी कचऱ्याचे कंटेनर वापरल्याच्या आरोप करीत मनसेच्यावतीने संबंधितावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी सदर एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली