PMC Election: पुण्यातून एवढे उमेदवार इच्छुक; ४ दिवसांत तब्बल साडेसहा हजार उमेदवारी अर्जांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 20:30 IST2025-12-26T20:29:40+5:302025-12-26T20:30:41+5:30
सर्वाधिक अर्ज विक्री कोथरूड–बावधन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून झाली असून कसबा–विश्रामबागवाडा कार्यालयातून सर्वात कमी विक्री नोंदविण्यात आली आहे

PMC Election: पुण्यातून एवढे उमेदवार इच्छुक; ४ दिवसांत तब्बल साडेसहा हजार उमेदवारी अर्जांची विक्री
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याच्या चौथ्या दिवशी तब्बल २ हजार ६६४ अर्जांची विक्री झाली. त्यानुसार आतापर्यंत सुमारे साडेसहा हजार अर्जांची विक्री झाली आहे. महापालिकेच्या निवडणूुक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी (दि. २६) सर्वाधिक अर्ज विक्री कोथरूड–बावधन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून झाली असून कसबा–विश्रामबागवाडा कार्यालयातून सर्वात कमी विक्री नोंदविण्यात आली आहे. तसेच शुक्रवारीच आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. शहरातील ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये स्थापन करण्यात आली असून, उमेदवारी अर्जांच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण ६ हजार ४३७ अर्जांची विक्री झाली असून शुक्रवारी २ हजार ६६४ अर्जांची विक्री करण्यात आली. शुक्रवारी कोथरूड–बावधन कार्यालयातून ५६७ अर्जांची विक्री झाली. त्याखालोखाल येरवडा–कळस–धानोरी (२२९), भवानी पेठ (२२३), हडपसर–मुंडवा (१७६), वारजे–कर्वेनगर (१७४), बिबवेवाडी (१६७), शिवाजीनगर–घोले रोड (१६६) आणि वानवडी–रामटेकडी (१६४) कार्यालयांचा क्रम लागतो. कसबा–विश्रामबागवाडा कार्यालयातून ८७ अर्जांची विक्री झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी एकूण आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये बिबवेवाडी कार्यालयांतर्गत तीन, वारजे–कर्वेनगर कार्यालयांतर्गत दोन, तसेच केै. बा. स. ढोले पाटील रोड, नगर रोड–वडगाव शेरी आणि कोथरूड–बावधन कार्यालयांतर्गत प्रत्येकी एक अर्ज दाखल दाखल झाला. महापालिका हद्दीत आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे राबविण्यासाठी विविध पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.