श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पंडीत रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठणाचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:42 IST2025-08-31T12:40:48+5:302025-08-31T12:42:17+5:30
पंडीत रसराज महाराज हे हिंदू धर्मग्रंथांचे सखोल आणि सुमधुर पठण आणि धार्मिक गीते आणि श्लोक सादर करण्यासाठी लोकप्रिय आहेत

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पंडीत रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठणाचे आयोजन
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून हनुमान भक्त पंडित रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराजांच्या हस्ते बाप्पाची महाआरतीही होणार आहे. येत्या मंगळवारी (दि. २) सायंकाळी पाच वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या देखावा मंडपात हा कार्यक्रम होणार आहे.
ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यंदा भारतातील अध्यात्म आणि धार्मिक संगीताच्या जगतातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पंडित रसराज महाराज यांच्या अमोघ वाणीतून हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडीत रसराज महाराज हे हिंदू धर्मग्रंथांचे सखोल आणि सुमधुर पठण आणि धार्मिक गीते आणि श्लोक सादर करण्यासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या विविध धार्मिक सादरीकरणांमध्ये, सुंदरकांड मार्ग विशेष लोकप्रिय आहे. अनेक उच्चभ्रू आणि सेलिब्रिटी वर्गात त्यांचा चाहता वर्ग आहे. पंडितजींची ख्याती देश विदेशात पसरलेली आहे. विविध धार्मिक समारंभ आणि कार्यक्रमांसाठी त्यांना विविध देशांमध्ये आमंत्रित केले जाते. ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि आशीर्वाद जागतिक पातळीवरील भाविकांपर्यंत पोहोचतात. पुणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पंडीत रसराज महाराज यांच्या अमोघ वाणीतील हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुनीत बालन यांनी केले आहे.