पर्यावरण संवर्धनाला शिवसेनेचे प्राधान्य; डोंगरमाथ्यावर बांधकाम बंदी, बिबट्यांसाठी स्वतंत्र उद्यान उभारणार – डॉ. नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 11:56 IST2026-01-11T11:55:05+5:302026-01-11T11:56:34+5:30
‘पुण्यातील टेकड्या या शहराची फुफ्फुसे आहेत. त्यावर होणाऱ्या छुप्या आणि बेकायदेशीर बांधकामांना शिवसेनेचा ठाम विरोध राहील

पर्यावरण संवर्धनाला शिवसेनेचे प्राधान्य; डोंगरमाथ्यावर बांधकाम बंदी, बिबट्यांसाठी स्वतंत्र उद्यान उभारणार – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : पर्यावरणाचे जतन व संवर्धन यांना शिवसेनेच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून डोंगरमाथा व डोंगरउतारांवरील सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घालण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षी किमान पाच लाख नवीन झाडे लावण्याचे उद्दिष्ट पक्षाने निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या बिबट्यांच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून पकडण्यात येणाऱ्या बिबट्यांसाठी भारतातील पहिले स्वतंत्र, सुरक्षित व निसर्गसंपन्न असे विशेष प्राणिसंग्रहालय उभारण्याचा निर्णय शिवसेनेच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या, ‘पुण्यातील टेकड्या या शहराची फुफ्फुसे आहेत. त्यावर होणाऱ्या छुप्या आणि बेकायदेशीर बांधकामांना शिवसेनेचा ठाम विरोध राहील. नद्यांचे प्रदूषण कमी करणे हे देखील आमच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे.’ यासोबतच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रत्येक गरजूला ५५० चौरस फुटांचे घर उपलब्ध करून देण्याचा संकल्पही त्यांनी मांडला.
बदलापूर येथील बलात्कार प्रकरणासंदर्भात बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी भाजपवर टीका केली. “या प्रकरणावर पडदा टाकणाऱ्या व्यक्तीला भाजपने स्वीकारलेला नगरसेवक बनवले होते. टीकेनंतर त्याला दूर केले असले, तरी ‘जो बूंद से गई, वह हौद से नहीं आती’ अशी स्थिती आहे,” असे त्या म्हणाल्या. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या शक्यतेविषयी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. गोऱ्हे यांनी सध्या तरी अशी कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.