सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 19:21 IST2026-04-06T19:19:18+5:302026-04-06T19:21:23+5:30
बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असून, या निवडणुकीत काँग्रेसने उतरवलेल्या उमेदवाराबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? या प्रश्नाचेही उत्तर दिले.

सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
Sharad Pawar on Baramati by Election 2026: "अशी भूमिका पक्षाने घेणं, यात काही चुकीचे नाही. त्या पक्षाचा हा निर्णय आहे. काँग्रेस एक मोठा राजकीय पक्ष आहे. त्यांनी निर्णय घेतला, त्यांचा अधिकार आहे. त्याची फार चर्चा करण्याचे कारण नाही", अशी भूमिका शरद पवार यांनी काँग्रेसच्या बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याच्या निर्णयावर मांडली. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार की नाही, याबद्दलही उत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असून, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), उद्धवसेना यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला आहे. दोन्ही पक्ष निवडणूक लढवणार नाहीत.
शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांना काँग्रेसने उमेदवार देण्याच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, "बिनविरोध होऊ द्या अशी मागणी करण्याचेही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल, तर समोरून कुणीतरी लढवेल, हे मान्य करूनच निवडणुकीत उतरायला हवे."
शरद पवार सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का?
तुम्ही सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला आहे. पण, तुम्ही किंवा सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहात का? असा प्रश्नही शरद पवारांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "नाही. आम्ही उमेदवारच उभा केला नाही. आमचा उमेदवारच नाही, प्रचार काय करायचा?"
"मागची निवडणूक जी झाली, त्यात सुप्रिया विरुद्ध हाच उमेदवार (सुनेत्रा पवार) होता. त्या निवडणुकीत सुप्रिया निवडून आली. त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही. सुप्रियाची चौथी निवडणूक होती. त्यामुळे पाठिंबा, निवडणूक लढवणं. कारण या निवडुणुकीबद्दल लोक काय मताचे आहेत, हे स्पष्टपणे दिसते", असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, कुटुंबप्रमुख म्हणून ती जबाबदारी माझ्यावर
"अनेक लोक अनेक निवडणुका लढवतात. यशस्वी होतात. राजकारणात जे पडतात, ते लोकांचं काम करण्यासाठी. अजित पवार हे लोकांसाठी काम करत होते. त्यांच्याबद्दल एक आदर आहे. दुर्दैवाने ते अपघाती निधनाने गेले, याचं दुःख कुटुंब म्हणून आम्हा सर्वांना आहे. पवार कुटुंबात एक पद्धत आहे, कुटुंबप्रमुख त्याची भूमिका, राजकीय नाही; बाकीची. ही आमच्या कुटुंबात पार पाडली जाते. आणि आज कुटुंबप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण ही निवडणूक लढवायची नाही", असेही पवार म्हणाले.