शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:00 IST2025-12-27T15:56:18+5:302025-12-27T16:00:41+5:30
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना युतीमध्ये लढणार आहे. जागावाटप अजून झालेले नाही. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांची बैठक एका पंचतारांकित हॉटेल मध्ये सुरू होती. त्यात दोन नेत्यांची वादावादी झाली.

शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेसेनेला सोबत घेण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. मात्र, शिंदेसेनेला जागा देण्याबद्दलच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. शिंदेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी ठिय्या दिला होता. त्यानंतर आता शिंदेसेनेच्या दोन नेत्यांमध्येच बैठक सुरू असताना राडा झाला. यानंतर शिंदेसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात निघून गेले. त्यामुळे शिंदेसेनेत जागांवरून खदखद असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला दूर ठेवले आहे, तर शिंदेसेनेला सोबत घेतले आहे. पण, जागावाटपाचा पेच सुटलेला नाही. शिंदेसेनेकडून ३५ जागांची मागणी करण्यात आली आहे. तर भाजपाकडून १५ जागांचाच प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदेसेनेमध्ये अस्वस्थता आहे.
शिंदेसेनेच्या बैठकीत नेत्यांमध्ये वाद
दरम्यान, शनिवारी शिंदेसेनेच्या नेत्यांची पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे यांच्यासह पक्षाचे शहरातील प्रमुख नेते होते. याच बैठकीत शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये वाद झाला.
जी माहिती सध्या समोर आली आहे, त्यानुसार, शिंदेसेनेच्या बैठकीत वाद झाला. पक्षाचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे आणि आमदार विजय शिवतारे यांच्यात वादावादी झाली. त्यात भानगिरे यांना शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बैठकीत मिळालेल्या वागणुकीनंतर नाना भानगिरे हे रागारागात हॉटेलमधून बाहेर पडले. त्यांची समजूत घालण्यासाठी नीलम गोऱ्हे यांची स्वीय सहाय्यक आले. मात्र, भानगिरे हे निघून गेले. नाना भानगिरे यांचा रागात निघून जातानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
दरम्यान, बैठकीला असलेल्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना याबद्दल माध्यमांनी प्रश्न केला. त्यावर गोऱ्हे म्हणाल्या की, "भानगिरे यांना एक कॉल आला होता. त्यांना एक निरोप आला होता. ते तुम्हाला काय बोलले मला माहिती नाही. त्यांचा गैरसमज नक्की दूर केला जाईल."
भाजपाच्या सांगण्यानुसार शिवसेना चालवणार का?
सध्या पुण्यात भाजपाने शिंदेसेनेला १५ जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. या प्रस्तावानंतर शिंदेसेनेत नाराजीची लाट आहे. काही पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर शुक्रवारी ठिय्या दिला. भाजपाच्या सांगण्यांनुसार शिवसेना चालणार का? असा सवाल पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेत्यांना केला.
त्यानंतर आज झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघेल अशी आशा होती. पण, त्यात नवाच वाद उफाळून आला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे, अशी चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली.