भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झटका; जिल्हा परिषद निवडणुकीआधी 'मिडनाईट मीटिंग'; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:30 IST2026-01-10T15:29:47+5:302026-01-10T15:30:24+5:30
- अजित पवार-शरद बुट्टे पाटील मध्यरात्री भेट; राष्ट्रवादीत पुनरागमनाची जोरदार चर्चा

भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झटका; जिल्हा परिषद निवडणुकीआधी 'मिडनाईट मीटिंग'; नेमकं काय घडलं?
पुणे/चाकण : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात (दि. ९) मध्यरात्री भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अचानक झालेल्या भेटीमुळे बुट्टे पाटील यांच्या राष्ट्रवादी(अजित पवार) गटामध्ये ११ वर्षांनंतर पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली जात असून, भामा खोऱ्यातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.
या भेटीवेळी शरद बुट्टे पाटील यांच्यासह पत्नी सुनीता बुट्टे पाटील, माजी सभापती चांगदेव शिवेकर, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ टेमगिरे, स्मार्ट व्हिलेज आंबेठाणचे सरपंच दत्ता मांडेकर, श्रद्धा मांडेकर, उद्योजक संदीप भोकसे, धनश्री भोकसे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, चेअरमन व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वराळे येथील बुट्टे पाटील यांच्या निवासस्थानी नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर, त्यांना सहकाऱ्यांसह पुण्यातील जिजाई निवासस्थानी बोलावण्यात आले. या भेटीत भामा खोऱ्यातील रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. चाकण-करंजविहिरे-वांद्रा, शिरोली-पाईट-वांद्रा, कडूस-किवळे-कोरेगाव, चांदुस-कोरेगाव-कुरकुंडी-धामणे आदी प्रमुख रस्ते तसेच कुंडेश्वर घाट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अर्थसंकल्पातून निधी देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय भामा–आसखेड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, आंबेठाण येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच दुर्गेश्वर लेणी व येसूबाई मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबतही चर्चा झाली. विकासकामांसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचे समजते.
११ वर्षांनंतर पुन्हा स्वगृही?
१९९९ मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेले शरद बुट्टे पाटील हे दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य व जिल्ह्याचे कृषी सभापती राहिले आहेत. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्यांना कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद मिळाले होते. पुणे पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत संधी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला.
२०१४ पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही विकासकामांसाठी अजित पवार यांचे सहकार्य त्यांना सातत्याने मिळत असल्याचे चित्र होते. लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पवार यांनी जाहीरपणे बुट्टे पाटील यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध अधोरेखित केले होते. या पार्श्वभूमीवर झालेली मध्यरात्रीची भेट ही केवळ विकासकामांपुरती मर्यादित आहे की, राजकीय पुनरागमनाची नांदी आहे, याबाबत भामा खोऱ्यातील राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी-शिवसेना आमने-सामने
विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार दिलीप माेहिते-पाटील यांच्या विराेधात खेड तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले होते. प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख हे आघाडीवर होते. यावेळी शरद बुट्टे पाटील यांनी मोहिते-पाटील यांना मदत केली होती. दरम्यान, सर्वपक्षीयांनी जोर लावत उद्धवसेनेचे बाबाजी काळे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घातली. त्यानंतर अनेक राजकीय स्थितंरणे घडली. अतुल देशमुख यांनी तुतारी सोडून हातात धुनष्यबाण घेतला तर आमदार बाबाजी काळे हे जरी उद्धवसेनेचे आमदार असले तरी स्थानिक पातळीवर त्यांनी शिंदेसेनेबरोबर राहण्याचे ठरवल्याचे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूक निकालावरून दिसते. राष्ट्रवादी (अजित पवार) गट सोडला तर भाजपचे शरद बुट्टे पाटील यांना पक्षीय ताकददेखील मिळत नसल्याची चर्चा आहे. शिवाय पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. या गटामध्ये बुट्टे-पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील हे उमेदवारी असण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या विरोधात आमदार काळे यांच्या भगिनी राजश्री जैद तर अतुल देशमुख हे रत्नमाला गाळव यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. तसेच माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या भावजय निशा गोरे यांनीही या गटातून उद्धवसेनेकडून लढण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आमदार काळे यांच्या पुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे शरद बुट्टे पाटील यांनी हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. याबराेबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून खेड तालुक्यात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी-शिवसेना आमने-सामने येणार आहेत.
जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी(शरद पवार) एकत्र आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी स्थानिक पातळीवरील दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी बैठकही झाली. त्यामध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत एकत्र लढवण्यावर चर्चाही झाली असून दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी याला सहमती दिल्याचे समजते. दरम्यान, आंबेगावमध्येही एकत्र लढण्याबाबत अद्यापही दोन्ही गटांचे एकमत झाले नाही.