पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे पुणेकरांचा कल; शहरात ६ लाख मूर्तींचे विसर्जन, पावणेदोन लाख मूर्ती दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:17 IST2025-09-08T13:17:03+5:302025-09-08T13:17:23+5:30
विशेष म्हणजे गतवर्षी संकलित केलेल्या व दान केलेल्या मूर्तींची संख्या १ लाख ७६ हजार ६७ होती, त्यामध्ये वाढ होऊन ती यंदा १ लाख ७८ हजार ३७६ झाली आहे

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे पुणेकरांचा कल; शहरात ६ लाख मूर्तींचे विसर्जन, पावणेदोन लाख मूर्ती दान
पुणे: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांना यश येत असून, मूर्ती दान करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील १ लाख ७८ हजार ३७६ गणेश मूर्तीचे संकलन झाले आहे. तसेच गणेशोत्सवात ११ दिवसांमध्ये ६ लाख ५० हजार ४२१ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत मूर्तीची संख्या आणि निर्माल्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी ५ लाख ५९ हजार ९५२ मूर्तीचे विसर्जन झाले होते.
महापालिका प्रशासनाकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. तसेच पुणेकरांनीनदी किंवा जलस्रोतांमध्ये गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे यासाठी व्यवस्थाही केली जाते. या दृष्टीने महापालिकेने शहरात विसर्जनासाठी ३८ ठिकाणी ६९ बांधीव हौद, २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या, ७ विहिरी, ४ तलाव, कालव्याच्या परिसरात ४१ ठिकाणांसह ३५ विसर्जन घाट, नदीपात्रात ३७ ठिकाणी विसर्जन व्यवस्था, २४१ ठिकाणी गणेश मूर्ती संकलन व दान केंद्र, ४६ ठिकाणी शाडू मूर्ती संकलन केंद्र, ३३८ ठिकाणी निर्माल्य कलश अशी व्यवस्था केली होती.
दीड दिवसाच्या गणेश विसर्जनापासून ६ सप्टेंबरपर्यंत शहरात ६ लाख ५० हजार ४२१ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. ही संख्या गतवर्षी ५० लाख ५९ हजार ९५२ इतकी होती. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे. यामध्ये अद्याप शेवटच्या विसर्जन दिवसाचा म्हणजे रविवारी दिवसभर विसर्जन झालेल्या मूर्तींची संख्या नाही. शहरात विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी दिवसभरात ४ लाख ४३ हजार ३९५ मूर्तीचे विसर्जन झाले. ही संख्या मागच्या वर्षी ३ लाख ७४ हजार १४८ होती. विशेष म्हणजे गतवर्षी संकलित केलेल्या व दान केलेल्या मूर्तींची संख्या १ लाख ७६ हजार ६७ होती, त्यामध्ये वाढ होऊन ती यंदा १ लाख ७८ हजार ३७६ झाली आहे.
निर्माल्य संकलन वाढले
महापालिकेने आपल्या सर्वच विसर्जन ठिकाणांवर आणि मूर्ती संकलन केंद्रांवर निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती. गणेश भक्तांनी ‘निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टीचा समावेश असावा. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मूर्ती किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. तसेच कोणीही निर्माल्य नदीपात्र, कालव्यात किंवा तलावात टाकू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. याला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून, ११ दिवसात ८ लाख ७६ हजार ३८१ किलो निर्माल्य संकलित झाले आहे. गेल्या वर्षी ७ लाख ६ हजार ४७८ किलो निर्माल्य संकलित झाले होते.