PMC Elections : महापालिका निवडणुकीवर टांगती तलवार कायम, इच्छुकांकडून खर्चाबाबत हात आखडता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:26 IST2025-11-25T18:25:49+5:302025-11-25T18:26:43+5:30
- सर्वाेच्च न्यायालयात आता शुक्रवारी होणार सुनावणी

PMC Elections : महापालिका निवडणुकीवर टांगती तलवार कायम, इच्छुकांकडून खर्चाबाबत हात आखडता
पुणे :पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत आणि प्रारूप मतदारयादी जाहीर झाली आहे. त्यावर हरकती - सूचना दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. पण, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त देण्याबाबत सर्वाेच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे निवडणुका होणार की नाहीत? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. अशा द्विधा परिस्थितीमुळे काही इच्छुकांनी खर्च करण्याबाबत आपला हात आखडता घेतला आहे.
पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर प्रारूप आरक्षण सोडतीवर २६ हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत. प्रारूप मतदारयादी जाहीर झाली असून, त्यावर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत आहे. प्रारूप मतदारयादीत अनेक चुका असून, तीन लाखांपेक्षा जास्त मतदारांची दुबार नोंदणी झाली आहे. मतदारांना गैरसोयीचे ठरणारे दूरच्या भागातील मतदारांची नोंदणी अनेक प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रारूप मतदारयादीच्या माध्यमातून सदोष पद्धतीने निवडणुका घेऊ नयेत, आधी मतदारयाद्या पूर्णपणे निर्दोष कराव्यात, त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या जानेवारीपर्यंत निवडणुका होणार हे लक्षात घेऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांनी कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, उज्जैनसह विविध ठिकाणी देवदर्शन सहली, हेलिकॉप्टरमधून राइड, महिलांना चारचाकी गाडीचे प्रशिक्षण आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणावरील सुनावणी पुढे जात असल्यामुळे काही इच्छुकांनी खर्च करण्याबाबत हात आखडता घेतला आहे. येत्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.