पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:28 IST2025-11-27T09:26:42+5:302025-11-27T09:28:35+5:30
- मतदारयादी दुरुस्त करूनच निवडणूक घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू

पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहेत. पुणे शहराच्या मतदारयादीमध्ये तीन लाखांहून अधिक आणि पिंपरी चिंचवड शहरात ९२ हजारांपेक्षा अधिक बोगस मतदार आहेत. या मतदारयाद्या दुरुस्त करून दोषमुक्त कराव्यात आणि मगच निवडणूक घेण्यात यावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा उद्धवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांची बुधवारी पत्रकार परिषदेच दिला. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस शहर प्रमुख संजय मोरे आणि गजनान थरकुडे, माजी सभागृहनेता अशोक हरणावळ, वसंत मोरे, अनंत घरत उपस्थित होते.
अहिर म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दुबार नाव नाेंदणी झाली आहे. मुंबई महापालिकेमध्ये तर महापौरांचे नाव दुबार आहे. यासंदर्भात महाविकास आघाडी म्हणून भूमिका मांडली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीचे शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचीही भेट घेतली आहे. मात्र, निवडणूक आयोग जबाबदारी टाळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले असले तरी, महापालिकांकडे एवढे मनुष्यबळ आहे का, हा मोठा प्रश्न आहे. शहरातील अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागांत टाकण्यात आली आहेत. नाव आणि पत्त्यांमध्ये मोठी तफावत आहे. मतदारयादी अनेक चुका आहेत. त्यामुळे यादी दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये,’ असेही अहिर म्हणाले.
मतदारयादीसंदर्भात केवळ विरोधकच अक्षेप घेत आहेत असे नाही तर महायुतीमधील भाजप व सहकारी पक्षांचेही नेते व पदाधिकारी अक्षेप घेत आहेत. ‘या सर्व घाईगडबडीने सत्ताधारी निवडणुका जाहीर करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उल्हासनगरमधील याद्यांची तक्रार करतात. इतर काही भागातील नेते संबंधित ठिकाणची सोयीनुसार तक्रार करतात. मात्र, राज्यात सगळीकडे हेच सुरू असताना यावर ते काहीच का बोलत नाहीत. पुण्यात जे सोबत येतील, त्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढविणार आहोत. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेतून इतर पक्षांत गेलेले अनेकजण आमच्या संपर्कात आहेत, मात्र अडचणीच्या वेळी जे सोबत राहिले त्यांना प्राधान्य असेल, असेही अहिर यांनी नमूद केले.
संजय मोरे म्हणाले, शहरातील दुबार मतदारांची नावे कशी काढणार, याचे उत्तर पालिका प्रशासनाकडे नाही. तशी यंत्रणा नाही. त्यामुळे यावर तोडगा कसा काढणार ते स्पष्ट करावे. गजानन थरकुडे म्हणाले, शहरातील सव्वातीन लाख मतदार दुबार आहेत. त्यामुळे ही छाननी पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका घेवू नये.
गणेश मंडळांना दिलेल्या नोटीस मागे घ्या
शहरातील दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जातो. मात्र, दुसरीकडे मंडळांना नोटिसा दिल्या जात आहेत. वातावरण खराब न करता सरकारने या सर्व नोटिसा मागे घेण्यात याव्यात, अशी मागणीही अहिर यांनी केली.