शिक्रापूर जिल्हा परिषद गट : घड्याळाचा काट्यावर काटा; तुतारीचा आवाज बारीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:22 IST2025-11-13T14:17:42+5:302025-11-13T14:22:19+5:30
- राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये काट्याची लढत रंगणार असून, त्यात भाजप आणि शिंदेसेनेचाही डावपेच रंग घेत

शिक्रापूर जिल्हा परिषद गट : घड्याळाचा काट्यावर काटा; तुतारीचा आवाज बारीक
शिक्रापूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर गट पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, इथला राजकीय आखाडा रंगू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये काट्याची लढत रंगणार असून, त्यात भाजप आणि शिंदेसेनेचाही डावपेच रंग घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात थेट सामना निश्चित झाला आहे. शिक्रापूर गट हा माजी आमदार अशोक पवार आणि स्थानिक अजित पवार गटाच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरत असून, दोन्ही बाजूंनी राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.
शिंदेसेनेचा धनुष्यबाण काहीसा म्यान
शिंदेसेनेचे स्थानिक नेते रामभाऊ सासवडे यांनी या गटात दावेदारी दर्शविली असली, तरी आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांचा उत्साह काहीसा मंदावल्याचे दिसत आहे. तरीही त्यांनी राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले आहे.
निवडीची लगबग
शरद पवार गटाकडून माजी सरपंच आबासाहेब करंजे यांच्या कुटुंबातील महिला किंवा माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी सासवडे या नावांची चर्चा आहे.
मात्र, या गटाची अंतिम उमेदवारी जाहीन झाल्यानंतरच 'तुतारीचा खरा आवाज' ऐकू येईल, असे स्थानिक राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
कमळ फुलवणार
भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवार घोषित झालेला नसला तरी पक्ष आपले 'कमळ' पुन्हा फुलवण्यासाठी अनपेक्षित चेहरा समोर आणण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीतील फुटीचा लाभ घेत मांचे विभाजन साधण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येत आहे.
कुसुम मांढरे विरुद्ध मोनिका हरगुडे लढत
सध्या शिक्रापूर जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व कुसुम मांढरे करत असून, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार गटात राहणे पसंत केले. शिवाय त्यांचे पती बाजार समितीचे संचालक आबासाहेब मांढरे यांनीही अजित पवार यांना खुले समर्थन दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी कुसुम मांढरे या इच्छुक असून, दुसरीकडे माजी पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे यांनीही दावेदारी जाहीर केल्याने अजितदादांच्या गटात काट्यावर काटा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्रापूर, सणसवाडी आणि कोरेगाव भीमा या औद्योगिक पट्ट्यातील मतदार विकास आणि रोजगारावर भर देणार आहेत, तर कासारीसारख्या शेतीप्रधान भागातील शेतकरी मतदारांचे मत आगामी निकाल ठरवू शकते.
शिक्रापूर गटातील घड्याळाचे 5 काटे आमनेसामने आले आहेत. तुतारीचा आवाज बारीक झाला असला, तरी अजितदादांच्या गटातील स्पर्धा तापली आहे. भाजपचे कमळ पुन्हा फुलवण्याचा प्रयत्न सुरू असून, धनुष्यबाण मात्र 'मॅन मोड'मध्ये आहे. या राजकीय तापमानात शिक्रापूर गटाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.