स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवार गटात होणार लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:01 IST2025-05-14T09:00:15+5:302025-05-14T09:01:34+5:30
भोर तालुक्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात, थोपटे गट लढण्यास तयार, इतर पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवार गटात होणार लढत
भोर :भोर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या सत्ताधारी पक्षातच होणार आहे. दोन्ही बाजूकडून पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार. मात्र, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट काय भूमिका घेणार हे निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
२०१७ साली झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या तीन गटांपैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रणजित शिवतरे, शिवसेना शिंदे गटाच्या शलाका कोंडे, पूर्वीचे काँग्रेस आणि आता भाजपचे विठ्ठल आवाळे विजयी झाले होते, तर पंचायत समितीच्या सहा पैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. यात माजी सभापती श्रीधर किंद्रे, लहू शेलार, दमयंती जाधव, मंगल बोडके, तर काँग्रेसचे रोहन बाठे तसेच शिवसेनेच्या पूनम पांगारे विजयी झाल्या होत्या. पंचायत समिती राष्ट्रवादीने ताब्यात ठेवली होती. मात्र, २०२२ साली राष्ट्रवादी व शिवसेना पक्ष फुटीनंतर नवीन दोन पक्ष झाले असून, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्याने भोर तालुक्यात राजकीय समीकरण बदलणार असून, राष्ट्रवादी व भाजप या दोन सत्ताधारी पक्षातच लढत होणार असल्याचे चित्र आहे.
भोर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचा गणाचे आरक्षण २०२२ सालीच जाहीर झाले होते. गटाच्या चार जागेवर तीन विद्यमान सदस्यांना पुन्हा संधी मिळणार आहे, तर गावांच्या फेरबदलाचा फटका काही आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना बसला आहे. तालुक्यात पूर्वी ५५ हजार लोकसंख्येचा एक गट असे तीन गट आणि सहा गण होते. त्याऐवजी ४० ते ४२ हजारांचा एक असे ४ गट व ८ गण करण्यात आले आहेत. सर्वांत लहान गावांचा गण वेळू असून, सर्वाधिक गावांचा गण भोलावडे आहे, तर सर्वांत कमी ३० गावांचा वेळू-नसरापूर गट आहे. तर सर्वाधिक ४० गावांचा गट भोलावडे-शिंद गट आहे. यामुळे यात कही खुशी कही गम अशी अवस्था आहे. वेळू-नसरापूर गट पुणे-सातारा महामार्गावरील व नसरापूर वेल्हे रस्त्यावरील गावांचा समावेश आहे. शलाका कोंडे या गटाचे नेतृत्व करत आहेत.
संगमनेर-भोंगवली हा भाटघर धरण भागातील गावे, हातवे खोरे व महामार्गावरील गावे आणि भोंगवली परिसर असा गट आहे. पूर्वी या गटातून तृप्ती खुटवड व चंद्रकांत बाठे यांनी विजय मिळवला आहे. सध्या या गटात विठ्ठल आवाळे नेतृत्व करीत आहेत.
भाजप प्रवेशामुळे राजकीय समीकरण बदलले
उत्रोली-कारी हा पूर्वीचाच गट असून, तसाच गट असून नावही तेच आहे. ३९ गावे आहेत फक्त या गटातील गावे कमी करून भोलावडे शिंद गटाला या दुसऱ्या गटाला जोडली आहेत. या गटात हिर्डोशी भागातील रायरी एकच गाव ठेवून बाकीची गावे शिंद गणाला जोडली आहेत.या गटात आंबवडेखोरे, वीसगाव खोरे, भोर महाड रस्त्यावरील काही गावांचा समावेश करून गट तयार करण्यात आला आहे. हा गट पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, गतवेळी राष्ट्रवादीचे रणजित शिवतरे यांनी हा गट जिंकला होता. यावेळी पुन्हा रणजित शिवतरे प्रमुख दावेदार असून भाजपकडुन माजी आमदार संग्राम थोपटे कोणाला उतरवणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. थोपटे यांचे गावही याच गटात येत असून, भाजपच्या दृष्टीने हा गट महत्त्वाचा असून गतवेळी हातातून गेलेला गट पुन्हा मिळविण्यासाठी भाजप तयारीत आहे. त्यामुळे यावेळीही चुरशीची लढाई पाहावयास मिळणार आहे. एकंदरीत दोन पक्ष फुटीनंतर आणि तालुक्यातील संपूर्ण काँग्रेस भाजपात गेल्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. ग्रामीण भागात भाजप वाढविण्यासाठी चांगला वाव असून, राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी संधी आहे.
पराभवाचा वचपा निघणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढतील असे जाहीर केले असले तरी भोर तालुक्यात तीन सत्ताधारी पक्षांतच लढत होणार, भोर तालुक्यात अजित पवार गट व शिंदे गट सत्तेत असून माजी आमदार संग्राम थोपटे भाजपात गेल्यामुळे तालुक्यातील प्रमुख पक्ष सत्ताधारी झाले आहेत, तर विरोधी पक्षात शरद पवार गट तितकासा प्रबळ नसून उद्धव ठाकरे गट तर आपल्या अस्तित्वाचीच लढाई लढत आहे. त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात लढत होईल आणि विधानसभा निवडणुकीत पूर्वीची काँग्रेस आणि आताचा भाजपचा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहावयास मिळत आहे.