‘आरक्षण बदलाने कुरुळी-मरकळ गटातील सत्तेचे खेळ बदलणार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:38 IST2025-11-11T13:37:30+5:302025-11-11T13:38:27+5:30
- या वेळेस जिल्हा परिषद गट महिला सर्वसाधारण जागेसाठी, तर कुरुळी पंचायत समिती गण ओबीसी महिला जागेसाठी आरक्षित झाला आहे.

‘आरक्षण बदलाने कुरुळी-मरकळ गटातील सत्तेचे खेळ बदलणार’
कुरुळी : मरकळ जिल्हा परिषद मतदार गटात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. गावागावात उमेदवारांची देवदर्शन वारी, विविध सामाजिक उपक्रम आणि लोकसंपर्क मोहिमा यांना जोर येत असून, इच्छुक उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधून जनाधार निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
हा गट एकेकाळी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. त्यांच्या काळात या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव ठळकपणे जाणवत होता. त्यानंतरच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या समर्थक शांताराम सोनवणे यांनी जिल्हा परिषद निवडणूक जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीमुळे आता या मतदारसंघातील संपूर्ण राजकीय गणितच बदलले आहे. या वेळेस जिल्हा परिषद गट महिला सर्वसाधारण जागेसाठी, तर कुरुळी पंचायत समिती गण ओबीसी महिला जागेसाठी आरक्षित झाला आहे. या फेररचनेमुळे महिला नेतृत्वाला मोठी संधी उपलब्ध झाली असून, राजकीय गोटात नवीन चेहऱ्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.
महाविकास आघाडी व महायुतीमध्ये उमेदवारीसाठी चुरस
या गटात सध्या प्रमुख चुरस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये आणि शिवसेना दोन्ही गटातून व भाजपमध्ये दिसून येत आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या कन्या, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे मागील विधानसभेतील उमेदवार सुधीर मुंगसे यांच्या पत्नी विनया मुंगसे, निघोजे गावचे माजी उपसरपंच अशीष येळवंडे यांच्या पत्नी आणि सन्मार्ग फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल येळवंडे या इच्छुक आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदिरा नीलेश थिगळे आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र या उमेदवारीवर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नसल्याने मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपकडून पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना पाटील गवारी, गौरी मुऱ्हे या देखील इच्छुक आहेत.
खासदार, आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, खासदार डॉ. अमोल कोल्हे व नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांना या विभागातून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही स्थानिक राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष आहे. खेड तालुक्यात अलीकडेच झालेल्या राजकीय बदलांमुळे कुरुळ-मरकळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यामुळे नवीन समीकरणे तयार होत आहेत. त्याचबरोबर, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या भूमिकेलाही या निवडणुकीत निर्णायक महत्त्व प्राप्त होणार आहे.