मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याचा आरोप चुकीचा - मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:37 IST2025-11-27T09:35:59+5:302025-11-27T09:37:54+5:30
मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याने भाजपचे शंभर नगरसेवक निवडून येणार, हा विरोधकांचा आरोप हरलेल्या मानसिकतेतून असून हा त्यांचा कट

मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याचा आरोप चुकीचा - मुरलीधर मोहोळ
पुणे : केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकास कामाच्या बळावर आम्हाला विविध निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याने भाजपचे शंभर नगरसेवक निवडून येणार, हा विरोधकांचा आरोप हरलेल्या मानसिकतेतून असून हा त्यांचा कट आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली.
फर्ग्युसन महाविद्यालयात बुधवारी (दि.२६) मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. तीन लाखांपेक्षा जास्त दुबार मतदार आहेत. त्यावरून सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मतदार यादी दुबार मतदार असणे हे चुकीचेच आहे.
ज्यांनी याच्या तक्रारी केल्या आहेत, त्यांचे स्वागतच केले पाहिजे. पण यावरून राजकारण होता कामा नये. मतदार याद्यांमध्ये दुबार नावे असणे, मृतांची नावे न वगळणे, पत्ते चुकीचे असणे यासह अनेक त्रुटी गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. त्यामुळे मतदार यादी पूर्णपणे अद्ययावत होणे आवश्यक आहे. मतदार यादीवरून मतचोरी केल्याचा आरोप झाला, पण यावरून ज्यांनी राजकारण केले त्यांचे बिहारमध्ये जे झाले ते इकडे पुन्हा होऊ शकते. मतदार याद्या अद्ययावत झाल्या पाहिजेत, ही भाजपची भूमिका आहे. महापालिकेत भाजपचे १०० नगरसेवक निवडून येणार, अशी अफवा पसरवणे हा विरोधकांचा कट आहे, असेही ते म्हणाले.
निवडणूक वेळेत होतील
स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त देण्यात आल्याने याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया जी काय सुरू आहे, त्याबाबत २८ तारखेला कळलेच. पण ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण पोहोचले आहे, त्या ठिकाणच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. मात्र, जेथे ५० टक्क्यापेक्षा कमी आरक्षण आहे, अशा जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका वेळेत पार पडतील, असाही विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.